maharashtra

स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर लोकांना जे आवडेल ते करा : खा श्रीनिवास पाटील


If you want to move forward in the age of competition, do what people like: Srinivas Patil
सर्वच शेतकऱ्यांनी एकाच वेळी शेताला पाणी देण्याचे ठरविले तर विद्युत डीपी फेल होतो. त्यामुळे दमादमाने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना व बाजारपेठेतील स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर लोकांना जे आवडेल ते करा, असे प्रतिपादन सिक्कीम माजी राज्यपाल व खा श्रीनिवास पाटील यांनी वडूज, ता. खटाव येथे केले.

सातारा : सर्वच शेतकऱ्यांनी एकाच वेळी शेताला पाणी देण्याचे ठरविले तर विद्युत डीपी फेल होतो. त्यामुळे दमादमाने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना व बाजारपेठेतील स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर लोकांना जे आवडेल ते करा, असे प्रतिपादन सिक्कीम माजी राज्यपाल व खा श्रीनिवास पाटील यांनी वडूज, ता. खटाव येथे केले.
हरणाई कृषी प्रदर्शन २०२२च्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हरणाई सूत गिरणी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे नेते रणजितसिंह देशमुख, इंदिराताई घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, डॉ सुरेश जाधव, मामु वीरकर, अशोकराव गोडसे, बाबुराव माने, बबनराव कदम, कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, मानाजी घाडगे, अभय देशमुख, सचिन माळी, परेश जाधव, नंदकुमार गोडसे, भरत जाधव, सत्यवान कमाने, विवेक देशमुख, परेश जाधव, नायब तहसिलदार जाधव, विकास काळे, निलेश घार्गे-देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
डोंगराई, जानाई, हरणाई या सर्व देवता आहेत. येथील कृषी प्रदर्शनात महिलांच्या सहभागाने डावी बाजू उजवी होत आहे, अशा शब्दात उपस्थित महिलांचा गौरव करीत खा. पाटील पुढे म्हणाले, सध्या शेतीसाठी पाणी जपून वापरले पाहिजे, पाटाच्या पाण्यात दगड टाकून डुबक असा आवाज ऐकण्यापेक्षा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. मतभेद मिटवून विकासाची पालखी वाहिली पाहिजे. अख्खा मसूर खाण्याच्या ४६ हॉटेलच्या शाखा झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकांना जे आवडेल तेच केले पाहिजे. सर्वांचा वाडा एक पण, चौकटी वाढल्या आहेत. एकमेकांचे मन जोडा. नद्या वाहत येतील असाही सल्ला त्यांनी दिला.
डॉ. येळगावकर म्हणाले, ज्यांनी विधायक संस्था उभ्या केल्या ते मतदारसंघातील लोक घरी बसले आहेत व ज्यांनी संस्था मोडीत काढल्या ते विधानसभेत पोहचले आहेत. रणजितसिंह देशमुख यांनी लवकर अनुभव घेतले तर ते मागे राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज द्या, अशी मागणी त्यांनी केली.
प्रस्तावना करताना रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले की, वडूज नगरीत हरणाई कृषी प्रदर्शनाची ही पहिलाच वेळ असल्याने गडबड झाली आहे. पुढील काळात योग्य नियोजन केले जाईल असे आश्वासन दिले. डॉ महेश गुरव यांनी आभार मानले. या हरणाई कृषी प्रदर्शनाला सर्वमान्य, लोकमान्य, जनमान्य उपस्थित असल्याचा खास उल्लेख खा. पाटील यांनी केला. त्यामुळे सर्वांचाच एकाच वेळी उल्लेख झाला. या कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी सुमारे तीन हजार शेतकरी कुटूंबानी भेट दिली असल्याची माहिती देण्यात आली.