maharashtra

जरंडेश्वर डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सातारा शहरातील मंदिरातही भाविकांच्या रांगा

श्रावणातील पहिल्या शनिवारी मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जांब, ता. कोरेगाव परिसरात असणाऱ्या जरंडेश्वर डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान सातारा शहर व परिसरातही मारुती मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

सातारा : श्रावणातील पहिल्या शनिवारी मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जांब, ता. कोरेगाव परिसरात असणाऱ्या जरंडेश्वर डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान सातारा शहर व परिसरातही मारुती मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात शनिवारी मारुतीची तर सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. कोरेगाव तालुक्यातील सातारारोड परिसरातील श्री मारुती जरंडेश्वर देवस्थान येथे जय श्री राम च्या गजरात, गुलालाची उधळण करून श्रावणातील पहिला शनिवार उत्साहात साजरा करण्यात आला. कोरेगाव तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या श्री मारुती जरंडेश्वर देवस्थान येथे श्रावणातील पहिल्या शनिवारचे निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. यावेळी कोरेगाव तालुक्यासह सातारा परिसरासह पुणे, मुंबई तसेच राज्यातील विविध भागांतून हजारो भाविकांसह प्रामुख्याने तरुणांनी विशेष गर्दी केली होती. आज श्रावणातील पहिल्याच शनिवारी सातारा शहरातील शनिवार पेठ ते देवी चौक मार्ग, जीवनज्योत हॉस्पिटल परिसर, नटराज मंदिर, कृष्णानगर परिसरात असणाऱ्या आणि नटराज मंदिरातील मारुती मंदिरात सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. विविध मंदिरांच्या बाहेर रुईच्या पानांच्या माळा, तेल, मीठ, काळेउडीद विक्री करणारी दुकाने लावण्यात आली होती. कोरेगाव आणि सातारा तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या जरंडेश्वर डोंगरावर आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक होती. डोंगराच्या पायथ्याला वाहन तळाचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांची गोची झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जरंडेश्वर डोंगरावरील मारुती मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.