शाश्वत विकासाच्या नऊ सुत्रावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करावीत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
सातारा : शाश्वत विकासाच्या नऊ सुत्रावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करावीत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत आमचे गाव, आमचा विकास उपक्रमात ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गौडा म्हणाले, शाश्वत विकासाच्या नऊ सुत्रांवर विकास आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी ग्रामपंचायत सदस्यासमवेत गावातील महिला, बालके, युवक-युवती, वंचित घटक, बचत गट, ज्येष्ठ नागरिक इत्यादींसह सर्व घटकांचा आणि गावातील तज्ञ मार्गदर्शकांचा सहभाग घेऊन या विकास आराखड्यामध्ये नाविन्यता आणावी. सातारा जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास साध्य करण्यासाठी विकास आराखडे बनवत असताना आपण हरित व स्वच्छ गाव ही संकल्पना प्राधान्याने राबवणार आहोत.
मॉडेल शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र यासह गाव पातळीवर पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जेचा वापर यावर भर द्यावा. सर्व तालुकास्तरीय व गणस्तरीय प्रशिक्षण वेळेत पूर्ण करावेत. चांगल्या कामांसाठी गावे सकारात्मक प्रतिसाद देतात हा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना योग्य माहिती देऊन प्राधान्यक्रम ठरवून आराखडे तयार करावेत असे आवाहन त्यांनी केले.
अर्चना वाघमळे म्हणाल्या, विकास आराखडा बनवत असताना सर्व विभागांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. त्यातून सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा आदर्श विकास आराखडा बनवता येईल. विकास आराखड्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा. यावेळी सुरेंद्र चव्हाण, आनंदा थोरात, विद्याधर गायकवाड, सचिन शेवाळे, संदीप कुंभार, बाळासाहेब भोसले, अरविंद राजकर आदींनी नऊ सूत्रानुसार विकास आराखडा बनवण्याचे प्रशिक्षण दिले.


