maharashtra

राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते

पंडित ऑटोमोटिव्ह वादात उदयनराजेंची उडी : कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार

If there was a monarchy, it would have been crushed under the feet of an elephant
गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार व कंपनी यांच्यात सुरू असलेल्या वादाचे स्वरूप आता मोठे झाले आहे. कामगार त्यांना हक्क मिळण्यासाठी न्यायालयात गेलेले असताना देखील कंपनीत त्यांना येऊ दिले जात नसल्याने हा वाद चिघळला असून आता या वादात खासदार उदयनराजे यांनीदेखील उडी घेतली असून कामगारांना न्याय द्या, अशी मागणी करत आज थेट कंपनीच्या दारात त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते, अशा शब्दात भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार व कंपनी यांच्यात सुरू असलेल्या वादाचे स्वरूप आता मोठे झाले आहे. कामगार त्यांना हक्क मिळण्यासाठी न्यायालयात गेलेले असताना देखील कंपनीत त्यांना येऊ दिले जात नसल्याने हा वाद चिघळला असून आता या वादात खासदार उदयनराजे यांनीदेखील उडी घेतली असून कामगारांना न्याय द्या, अशी मागणी करत आज थेट कंपनीच्या दारात त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते, अशा शब्दात भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
गटात तीन चार दिवसापासून पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी व कामगारांमधील वादाची ठिणगी पडली असून ही कंपनीची जागा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कायदेशीर प्रक्रियेतून घेतलेली असल्याचे समोर आले आहे. तरीदेखील हा वाद मिटलेला नाही. कारण या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर देयके गेल्या अनेक वर्षापासून थकीत आहेत. त्यातच कामगार कंपनीत काम करत असताना तिथे आमदार भोसले यांनी काही गुंड ठेवल्याने कर्मचाऱ्यांना कंपनीत जाता येत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
यावर कामगारांची बाजू तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बाजू माध्यमातून आली. मात्र तरीही कामगार व त्यांची कुटुंबे कंपनीच्या गेट बाहेर बसून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. याठिकाणी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली आणि कामगारांची बाजू ऐकून घेतली. यावेळी कामगारांनी आमच्यावर दहशत निर्माण करण्यात येत असल्याची तक्रार केली. तसेच आम्हाला न्याय देण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
उदयनराजेंनी कामगारांशी संवाद साधताना त्यांच्या भावना ऐकल्यानंतर इथे कोण गुंडगिरी असं करत असतील तर पोलिसांनी खपवून येऊ नये. कारण या गुंडगिरीचा पोलिसांना आणि सर्वसामान्यांना त्रास होणार आहे. या कामगारांना न्याय देण्याची भूमिका एमआयडीसीतील संबंधित अधिकारी का घेत नाहीत? त्यांच्या भोंगळ कारभाराचा मी पर्दाफाश करणार आहे. यावेळी महाराज साहेब ही लोकशाही असून देखील आम्हाला न्याय मिळत नसल्याची कैफियत कामगारांच्या एका पत्नीने मांडली.
त्यावेळी राग अनावर झालेल्या उदयनराजे यांनी तुम्ही पुन्हा राजेशाहीची मागणी करा. लोकशाहीत न्याय मिळत नसेल तर राजेशाही असती तर गुंडगिरी करणार्‍या एकेकाला हत्तीच्या पायाखाली चिरडले असते. मी अन्याय कधी खपवून घेत नाही, अशा भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी तसेच प्रशासनाने तातडीने हालचाली कराव्यात, असे सांगितले.
प्रकरणातील सर्व कागदपत्रे व माहिती घेऊन या कामगारांना न्याय देण्याची गरज असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता तो बंद करण्याचा कोणाला अधिकार नसल्याचे खासदार उदयनराजे यांनी स्पष्ट केले. दुपारी कंपनीत उदयनराजे यांची इंट्री झाल्यानंतर पुन्हा तिथे खळबळ माजली होती. तिथे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला होता. तसेच कामगार व त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. यावेळी कामगारांनी पुन्हा आम्हाला जर न्याय मिळाला नाहीतर आम्ही कंपनीसमोर आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. आता या वादात उदयनराजे भोसले यांनी उडी घेतल्याने या कामगारांना न्याय मिळणार की पुढील आणखी प्रक्रिया वाढत जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.