पालखी महामार्गाचे काम बंद पडल्यास सतीश धुमाळ जबाबदार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गासाठी भोगवटादार वर्ग - १ शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई बँकेत जमा केल्यानंतर क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी सतीश धुमाळ आणि त्यांच्या कार्यालयाकडून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे १० टक्के रक्कम कपातीबाबतचे पत्र बँकेस देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे.
आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गासाठी भोगवटादार वर्ग - १ शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई बँकेत जमा केल्यानंतर क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी सतीश धुमाळ आणि त्यांच्या कार्यालयाकडून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे १० टक्के रक्कम कपातीबाबतचे पत्र बँकेस देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भोगवटादार वर्ग - १ शेतकऱ्यांच्या भूमी संपादनाबाबत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी सतीश धुमाळ हे बँकेला चुकीचे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणूक सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या सतीश धुमाळ यांच्या एकूण कारभाराबाबत शेतकऱ्यांच्या मध्ये तीव्र असंतोष असून संबंधित शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळाला नाही तर नियोजित आळंदी-पंढरपूर महामार्गाचे काम बंद पाडण्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला असून महामार्गाचे काम बंद पडल्यास त्यास सर्वस्वी सतीश धुमाळ जबाबदार राहतील असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
याबाबतचे निवेदन पिडीत संगिता सुरेश नाळे (दातेवस्ती, सस्तेवाडी, फलटण) आणि महेश श्रीकृष्ण दाते (फलटण) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेस दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पीडित शेतकऱ्यांचे हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
मी एक महिला शेतकरी असून मीच घरातील कर्ती आहे. बँकेच्या संबंधित अधिकारी या सुद्धा एक महिला असूनही केवळ क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी धुमाळ यांनी त्यांना केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे माझ्या अर्जाची आणि कागदपत्रांची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे कपात केलेल्या १० टक्के रकमेबाबत आम्ही बँकेच्या अधिकार्यांना वारंवार भेटून त्यांनी सदरची रक्कम आमच्या खात्यात वर्ग केलेली नाही. याला सर्वस्वी जबाबदार क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी सतीश धुमाळ असून आमच्यावर करण्यात आलेल्या अन्यायाबाबतचे निवेदन आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांना दिले आहे.
भ्रष्टाचारी सतीश धुमाळ कडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी दलालांची नेमणूक
आळंदी-पंढरपूर महामार्गाच्या कामासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्यांना राज्य शासनाकडून पूर्ण नुकसान भरपाई देण्यात येत आहे. मात्र क्र. १६ चे भूमी संपादन भ्रष्टाचारी अधिकारी सतीश धुमाळ यांनी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई रकमेतील दहा टक्के वसुली करण्यासाठी दलालांची नेमणूक केलेली आहे. या दलालांच्या मार्फत सतीश धुमाळ हे शेतकर्यांचे आर्थिक पिळवणूक करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांची पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत सदर महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला असून सतीश धुमाळ या भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.धनंजय महामुलकर,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


