सातारा तालुक्यातील ठोसेघर परिसरात पळसवडे येथे बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पळसवडेच्या वनसमितीचे अध्यक्ष असलेल्या माजी सरपंचाने वनविभागातील महिला वनरक्षकालाच गंभीर स्वरुपाची मारहाण केली. या घटनेत ती महिला वनरक्षक गंभीर जखमी झाली असून ती गर्भवती असताना देखील तिला मारहाण करणार्या माजी सरपंचाविषयी समाजात तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सातारा : सातारा तालुक्यातील ठोसेघर परिसरात पळसवडे येथे बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पळसवडेच्या वनसमितीचे अध्यक्ष असलेल्या माजी सरपंचाने वनविभागातील महिला वनरक्षकालाच गंभीर स्वरुपाची मारहाण केली. या घटनेत ती महिला वनरक्षक गंभीर जखमी झाली असून ती गर्भवती असताना देखील तिला मारहाण करणार्या माजी सरपंचाविषयी समाजात तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, मारहाण करत असल्याच्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर झळकला असून त्या महिला वनरक्षिकेच्या पतीदेखत हा प्रकार घडला असून याप्रकरणी माजी सरपंच असलेल्या रामचंद्र जानकर याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, सातारा तालुका वनविभागात कार्यरत असलेल्या महिला वनरक्षक सिंधू सानप या ठोसेघर परिसरातील कामकाज पाहत असतात. गेल्या काही महिन्यांपासून त्या ठोसेघर विभागात कार्यरत असून पळसवडे येथे वनविभागाचे काही कामही सुरु आहे. बुधवारी वनविभागाची व्याघ्रगणना सुरु असल्याने सानप यांनी पळसवडे येथील काही मजुरांना या गणनेच्या कामासाठी त्यांच्यासमवेत नेले. त्या मजुरांना घेवून गेल्यानंतर त्या परिसरात वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर हे तिथे गेले.
त्या परिसरात महिला वनरक्षक सानप व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरेही तिथे होते. तिथे मला न विचारता कामावरील मजूर दुसरीकडे का नेले, अशी विचारणा रामचंद्र जानकर यांनी केली. त्यातून वाद वाढत गेला. यावेळी जानकर यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी चप्पल हातात घेवून ठोंबरे यांच्या अंगावर धावून जात ठोंबरे यांना मारहाण सुरु केली. ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना महिला वनरक्षक सानप यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता अश्लिल भाषेत शिवीगाळ करत रामचंद्र जानकर तसेच प्रतिभा जानकर यांनी महिला वनरक्षक सानप यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
ही घटना घडत असताना तिथे वनमजूर तसेच पळसवडेचे ग्रामस्थही उपस्थित होते. मात्र, कोणीही ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेत महिला वनरक्षक सानप यांना डोक्यात दगड मारण्यात आला. तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या तीन महिन्याच्या गर्भवती असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारे महिला कर्मचार्याला मारहाण करणार्या जानकर दाम्पत्याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ही बाब वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली. झालेला प्रकार बन्सल यांना सांगून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहिते यांच्यासह वनविभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी केली. बन्सल यांनी संशयितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून सायंकाळी महिला वनरक्षक सानप व त्यांचे पती ठोंबरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रामचंद्र जानकर व प्रतिभा जानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


