maharashtra

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठेकेदाराची केंद्रीय अधिकाऱ्यालाच दमबाजी

दमबाजीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ : प्रशासनाचे कानावर हात

एका अन्न पुरवठा ठेकेदाराने थेट केंद्रीय अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमक्ष दमबाजी करण्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी बैठक तर शांततेत झाल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

सातारा : सातारा जिल्हा ही ऐतिहासिक महत्व असलेली आणि क्रांतीवीरांची भूमी. या भूमीत अन्याय खपवून घेतला जात नाही आणि अन्याय केला जात नाही, अशी ख्याती. मात्र, आता सातारा जिल्ह्याचे ते स्वरुप राहिलेले नाही. राजकीय मंडळी आणि ठेकेदारांचे स्तोम फारच वाढले असून हे स्तोम वाढवण्याला प्रशासनातील अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. एका अन्न पुरवठा ठेकेदाराने थेट केंद्रीय अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमक्ष दमबाजी करण्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी बैठक तर शांततेत झाल्याचे सांगत कानावर हात ठेवले.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, सोमवारचा दिवस असल्याने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय नेहमीप्रमाणे हाऊसफुल्ल असतेच. त्यातच पुरवठा विभागाची बैठकही जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होती. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि अन्न पुरवठा करणारे ठेकेदारही उपस्थित होते. याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकार घडल्याचा सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ सांगत आहे. खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेरच केंद्र सरकारच्या अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक आशुतोष सिंग आणि अन्न पुरवठा ठेकेदार फिरोज पठाण यांच्यात हमरातुमरी सुरु असल्याचे या व्हिडिओत दिसत असून यावेळी पठाण हे आशुतोष सिंग यांच्या अंगावर धावून जात असून त्यांना इतर अधिकारी थांबवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
आता यावेळी पठाण व आशुतोष सिंग यांच्यात कशामुळे व कोणत्या कारणासाठी वाद झाला असावा, ही बाब समोर आलेली नाही. मात्र, प्रशासनाच्या कार्यालयात अशा प्रकारे ठेकेदार क्लासवन अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात असतील तर हा प्रकार कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे काढणारा असल्याच्या प्रतिक्रिया या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या हमरातुमरीच्या व्हिडिओमुळे सातारकरांमध्ये व्यक्त होत आहेत. वास्तविक अशा प्रकारे जाहीरपणे दमबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होवून देखील याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत कोणतीही तक्रार वा कसलीही नोंद झालेली नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन, उपोषण आणि या ना त्या कारणाने पोलिसांचीही वर्दळ असतेच. मात्र, तरीही एक ठेकेदार थेट केंद्रीय अधिकाऱ्यांवर डोळे वटारुन अधिकाऱ्यांच्या अंगावर मारण्याच्या आवेशात धावून जात असेल तर हा प्रकार म्हणजे ठेकेदारी शासनाच्या पैशामुळे किती उन्मत झाली, याचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
प्रशासनाचे कानावर हात
हा प्रकार पुरवठा विभागाशी संबंधित असल्याने आणि पुरवठा विभागाचा एक ठेकेदार खुद्द पुरवठा विभागातील केंद्रीय अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जात दमबाजी करत असेल तर अत्यंत गंभीर प्रकार असल्याने याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता देवकाते यांनी असला काही प्रकार घडलाच नाही. कोणी कोणाला दम दिला, असाच उलट सवाल केला. पुरवठा विभागाची बैठक अत्यंत शांततेत पार पडली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा काही करमणुकीचा भाग नव्हता. मात्र, अशा प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होवून देखील प्रशासनाने तो अद्याप पाहिलेलाही नव्हता व त्यांना काहीच माहिती नसल्याचे सांगत प्रशासनाने कानावर हात ठेवले.
 
पोलिसात कोणताही गुन्हा नोंद नाही
वास्तविक खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातच अशा प्रकारे शासनाच्या कृपेने काम करत असलेला ठेकेदार उन्मत्तपणे अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जातो. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो. त्यामुळे जिल्ह्यात नेमके कोणाचे राज्य आहे ठेकेदारांचे, प्रशासनाचे की लोकप्रतिनिधींचे? असाच प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. एखादा सामान्य माणूस अधिकाऱ्याला त्याच्या कामाबद्दल काही विचारण्यास गेला तर त्याच्याशी न बोलणारे अधिकारी किंवा त्याची दखल न घेतल्यास सामान्य माणूस रागातून काही बोलल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून लगेच तक्रार दाखल करणारे अधिकारी या ठेकेदाराबाबत मूग गिळून का गप्प असल्याचा सवाल या व्हिडिओतील हमरातुमरीच्या प्रकारामुळे सातारकरांना पडला असून याबाबत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार वा गुन्हा दाखल नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.