सरकारी कामात अडथळा केल्याने आरोपीस तीन महिन्यांची कैद
दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांचे आदेश
सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा शाबित झाल्याने दोन आरोपींना अनुक्रमे तीन महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंड आणि दुसऱ्या आरोपीस तीन महिने साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांनी ही शिक्षा सुनावली. याप्रकरणी एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले.
सातारा : सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा शाबित झाल्याने दोन आरोपींना अनुक्रमे तीन महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंड आणि दुसऱ्या आरोपीस तीन महिने साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांनी ही शिक्षा सुनावली. याप्रकरणी एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले.
या खटल्याची माहिती अशी, महाड ते महाबळेश्वर या रोडवर पार्थ प्लाझा हॉटेलच्या समोर 27 डिसेंबर 2014 रोजी रात्री साडेबारा वाजता फिर्यादी मिथुन शिवाजी यादव रा. पारगाव खंडाळा हे आपल्या ताब्यातील एसटी मुंबई सेंट्रल ते पोलादपूर महाबळेश्वर येथून जात असताना मयूर चंद्रकांत झगडे रा. गोकुळ नगर, मळद, ता. बारामती व विनायक भगवान ढगे गोकुळ नगर, मळद, ता. बारामती यांनी गाडी अडवून एसटी ड्रायव्हर यादव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केली होती. एसटी चालकाने साईड न दिल्यामुळे आरोपींच्या अल्टो गाडीचा टायर कठड्याला घासला गेल्याने वादाचा प्रसंग उदभवला होता. यादव यांना लाथाबुक्क्यांनी सुद्धा मारहाण झाल्याची फिर्याद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली. या गुन्ह्याचा तपास हवालदार एस. वाय. कांबळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
हा खटला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्या कोर्टासमोर चालला. सरकारतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील एल. के. खाडे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यामध्ये एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश सालकुटे यांनी मयूर झगडे याला तीन महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंड आणि विनायक ढगे याला तीन महिने साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. अंमलदार बी. एस. काळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.


