सातारा उपनिबंधक आणि संजीवनी ना. पतसंस्थेची मिलीभगतभूखंड लाटण्याचा डाव;
तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने दिला 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा
सातारा उपनिबंधक आणि संजीवनी नागरी पतसंस्थेच्या साटेलोट्यामुळे एका कर्जदार भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा खटाव तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सातारा : सातारा उपनिबंधक आणि संजीवनी नागरी पतसंस्थेच्या साटेलोट्यामुळे एका कर्जदार भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा खटाव तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, दि. 9 एप्रिल 2007 रोजी विठ्ठल मारुती भोसले (वय 76, मूळ रा. अंबवडे, ता. खटाव, जि. सातारा. सध्या रा. मल्हार पेठ, सातारा) यांनी शेती व व्यवसायासाठी संजीवनी नागरी पतसंस्थेकडून 5 लाख 80 हजार रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकित राहिल्यामुळे संजीवनी नागरी पतसंस्थेने विठ्ठल भोसले यांना लिलाव नोटीस पाठवली. नोटीस मिळताच विठ्ठल भोसले हे थकबाकी जमा करण्यासाठी पतसंस्थेकडे डीडी सुद्धा घेवून गेले. मात्र, जमिनीच्या हव्यासामुळे पतसंस्थेने हे डीडी स्विकारले नाहीत. यानंतर पतसंस्थेने पुढील कार्यवाहीसाठी वडूज येथील सहा. उपनिबंधकांकडे दाद मागितली असता ती फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे पतसंस्थेने सातारा उपनिबंधकांकडे लिलाव प्रक्रियेबाबत अपील केले.
संजीवनी नागरी पतसंस्थेच्या धोरणांमुळे विठ्ठल भोसले यांनी कोल्हापूरच्या निबंधकांकडे आपली बाजू मांडली. कोल्हापूरच्या निबंधकांनीही 16 डिसेंबर 2015 रोजी भोसले यांना एक महिन्याची मुदत देत हे कर्ज भरण्याविषयी सांगितले. त्यानुसार भोसले यांनी पतसंस्थेत जाऊन पतसंस्थेकडे अकाऊंट नंबर मागितला. मात्र, पतसंस्थेने भोसले यांना अकाऊंट नंबर दिला नाही. त्यानंतर अथक परिश्रमानंतर भोसले यांनी पतसंस्थेमधील अकाऊंट नंबर मिळवला व 16 जानेवारी 2016 रोजी मुद्दल आणि व्याज असे बारा लाख साठ हजार रुपये आरटीजीएस ने भरले. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया थांबणे संयुक्तिक होते.
मात्र, तसे न होता त्याचदिवशी सातारा उपनिबंधकांनी निकाल देत लिलाव प्रक्रिया करण्यास संस्थेस परवानगी दिली. परवानगी मिळताच संस्थेने संबंधित तारण जागेचा ताबा न घेता सरसकट जमिनीची विक्री केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही संस्थेस लिलाव प्रक्रिया करण्यापूर्वी त्या तारण जागेचा ताबा घ्यावा लागतो. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना फाट्यावर मारत बेकायदेशीरपणे संजीवनी नागरी पतसंस्थेने तारण जमिनीबरोबरच विनातारण जमिनीचीही परस्पर विक्री केली आहे. त्याचबरोबर वरातीमागून घोडे या उक्तीप्रमाणे संजीवनी ना. पतसंस्था आता जमिनीचा कब्जा घेण्यासाठी वडूज तहसिलदार व मंडल अधिकारी निमसोड यांच्याबरोबर साटेलोटे करीत जबरदस्ती करीत आहे. त्यामुळे विठ्ठल भोसले यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ येवून ठेपली आहे. या अन्यायाविरोधात विठ्ठल भोसले यांनी दि. 26 जानेवारी 2022 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री व अधिकार्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
कर्जदाराने कर्ज भरुन ही सहकारात मिळालेल्या कायद्माचा गैरफायदा घेऊन संस्था सावकारीला पण लाजवेल असे कृत्य करित असेल आणि सातारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय हे त्यांना सहकार्य करित असेल तर अशांना धडा शिकविला पाहीजे, ऑर्डर देताना संस्थेने किती ठेवले आहे येवढेच पाहून जर आदेश होत असतील तर असा सर्व प्रकरणांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
महारुद्र तिकुंडे , ( माहिती अधिकार) संस्थापक - अध्यक्ष, युवा राज्य फौंडेशन, महाराष्ट्र राज्य


