शेतीच्या विकासासाठी एका सहकारी पतसंस्थामधुन कर्ज घेतले. शेतमालाला, दुधाला भाव मिळत नाही. यामुळे ते कर्ज फेडू शकलो नाही. आता मी कर्जबाजारी झालो असून, मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी साजूर, ता. कराड येथील शेतकरी प्रवीण विठ्ठल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सातारा : शेतीच्या विकासासाठी एका सहकारी पतसंस्थामधुन कर्ज घेतले. शेतमालाला, दुधाला भाव मिळत नाही. यामुळे ते कर्ज फेडू शकलो नाही. आता मी कर्जबाजारी झालो असून, मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी साजूर, ता. कराड येथील शेतकरी प्रवीण विठ्ठल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ते अनेक वर्षापासून कर्जबाजारी आहेत. एका सहकारी पतसंस्थेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते. परंतु, कोणत्याच सरकारने शेतमालास व दुधाला चांगला भाव मिळेल असे कोणतेच धोरण राबवले नाही. अनेक प्रयत्न करून, थोडे थोडे पैसे भरूनसुद्धा ते कर्ज फिटले नाही.
संबंधित संस्थेकडून वसुलीसाठी तगादा सुरू आहे. वसुली अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला अपमानीत करण्यात येत आहे. मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करतो, असे सांगून मानसिक छळ होत आहे. त्यामुळे संबंधित वसूली अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच प्रकृतीच्या कारणास्तव आम्हाला कोणतेही कामही जमत नाही आणि कर्जफेड अशक्य झाले असून आत्महत्येस परवानगी मिळावी. अन्यथा येत्या १ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.


