वडुथ, ता. सातारा येथे राहत्या घरी अकॅडमीच्या फी चे पैसे भरण्यास न दिल्याने एका १७ वर्षीय मुलीने रागातून विषारी औषध प्राशन केल्याने तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारास दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सारीका ज्ञानेश्वर सकटे (वय १७) असे मुलीचे नाव आहे.
सातारा : वडुथ, ता. सातारा येथे राहत्या घरी अकॅडमीच्या फी चे पैसे भरण्यास न दिल्याने एका १७ वर्षीय मुलीने रागातून विषारी औषध प्राशन केल्याने तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारास दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सारीका ज्ञानेश्वर सकटे (वय १७) असे मुलीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सारीका सकटे हिचे मुळ गाव वडुथ ता. सातारा असून ती इयत्ता ११ वी मध्ये शिकत होती. तिला अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. परंतु पाच वर्षापूर्वी तिच्या वडीलांचे निधन झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडीलानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर येऊन पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तिची आई मोलमजुरी करत आहे. सारीका व आणखी दोन भावाच्या शिक्षणाचा खर्च असल्याने तिच्या आईने अकॅडमीचे पैसे भरण्यास नकार दिला. यांचा राग मनात धरून तिने दि. २८ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात उंदिर मारण्याची पावडर पाण्यातून प्राशन केली. यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु दि. २ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


