maharashtra

माण विधानसभा निवडणुक ‘प्रहार’ लढवणार : आ. बच्चू कडू


माण-खटाव विधानसभा मतदार संघात तेथील आमदार जयकुमार गोरे यांना माझे आवाहन राहणार असल्याचे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, शासन शेतकर्‍यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक आरक्षण द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितलेे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांशी आमची बांधिलकी आहे. त्यांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पंधरा ठिकाणच्या विधानसभा मतदार संघात दहा ते पंधरा आमदार निवडून आणणार आहे. विशेषत: सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रहार संघटना मोठ्या ताकदीने म्हणजे 120 टक्के लढविणारच आहे. या निवडणुकीसाठी मी कोणतीही युती करणार नाही अन मुळात युती मी मानतही नाही. माझी युती ही फक्त जनतेशीच आहे. त्यामुळे माण-खटाव विधानसभा मतदार संघात तेथील आमदार जयकुमार गोरे यांना माझे आवाहन राहणार असल्याचे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, शासन शेतकर्‍यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक आरक्षण द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितलेे.
सातारा येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानासाठी आल्यावर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उपस्थित प्रश्नांवर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
आ.बच्चू कडू म्हणाले, सातार्‍यात अतिशय चांगल्या पध्दतीने दिव्यांगांचा कॅम्प आयोजित केलेला आहे. पण इथल्या सिव्हील सर्जनच्या खूप तक्रारी असल्या तरी जिल्हाधिकारी यांचे काम चांगले आहे. काही शासन निर्णय बदलणे गरजेचे आहे. दिव्यांगांंच्या बाबतीत काही निर्णय बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार नाही. या अभियानात सातारा जिल्हा राज्यात आदर्श ठरेल अशी अपेक्षा आहे. यासाठी मी दोन महिन्यातून एकदा येथे येणार आहे. आता दिव्यांगांंच्या अडचणीचे काय धोरण आहे ते ठरवून त्यासाठी चांगल्या निर्णयाचे तोरण बांधणार आहे. यापुढे दिव्यांगांकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीत याचे उत्तर संबंधितांना मिळणार आहे. कारण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दिव्यांगांची संख्या मोठी आहे.
दिव्यांगांच्या मेळाव्यास पालकमंत्री शंभुराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील आले होते. मात्र सातारा जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. याबाबत आ. बच्चू कडू म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींनी कोणत्या मेळाव्यात जावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणत्या मंदिरात जावे की, मस्जिदमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे. याबाबत मी कसं सांगणार. आता या मेळाव्यामुळे सारेच लोकप्रतिनिधी हे जागृत राहणार आहेत. एका तालुक्यात सात हजार दिव्यांग आहेत. त्यामुळे आता ही मोठी संख्या पाहून त्यांनाही आता सर्वांनाच पळावेच लागेल. दिव्यांग मंत्रालय एवढे मोठे दिलं त्याचे खाते सीएम यांच्याकडे आहे ही मोठी गोष्ट आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर पत्रकारांनी बोलते केल्यावर मला मंत्रीपद नको आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रहार संघटना राज्यात 15 ठिकाणी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर कडू यांनी सातारा जिल्ह्यातही निवडणूक लढविणार आहे. यासाठी माण-खटाव मतदारसंघात प्रहारचा उमेदवार 120 टक्के असेल असे सांगितले. तर यावर त्यांना तुम्ही युतीत असताना माण मतदारसंघाबाबत असा निर्णय घेणार का? असा प्रश्न केल्यावर त्यांनी मी युती मानत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्याचबरोबर राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी कोणतेही सरकार शेतकर्‍यांना देण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे आरक्षणासारखे मुद्दे पुढे येत आहेत असे सांगतानाच लोकसंख्येत शेतकर्‍यांचा वाटा किती ? त्याप्रमाणात राज्य आणि केंद्र शासनाने शेतकर्‍यांना वाटा द्यावा. तसेच शेतकर्‍याला आर्थिक आरक्षण द्यायला हवे, असेही स्पष्ट केले. दरम्यान, सातारा जिल्ह्यात दोन महिन्यातून एकदा येवून येथील दिव्यांग समाजाचे प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे ही यावेळी सांगितले.
आगामी निवडणुका पाहता शरद पवार गटातील कोण ना कोण इकडे महायुतीत येईल अन दिवाळीपूर्वीच मोठा धमाका होईल. याबाबत आपले काय मत आहे, असे विचारले असता आ. बचू कडू म्हणाले, मी याकडे लक्ष देत नाही. आम्हांला दिव्यांगांच्या समस्या सोडविणे महत्वाचे आहे. याबाबत कोण येणार अन कोण जाणार, याकडे पाहत बसत नाही.