maharashtra

नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे : जितेंद्र पाटील


वाहतुकीसाठी असणाऱ्या नियमांचे पालन केले जात नाही. सीट बेल्ट बांधणे, हेल्मेट वापरणे, बेगमर्यादेचे उल्लंघन करणे असे प्रकार अद्याप सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.

सातारा : वाहतुकीसाठी असणाऱ्या नियमांचे पालन केले जात नाही. सीट बेल्ट बांधणे, हेल्मेट वापरणे, बेगमर्यादेचे उल्लंघन करणे असे प्रकार अद्याप सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.
रस्ते अपघातात बळी पडलेल्या निष्पाप व्यक्तींसाठी पाळण्यात येणाऱ्या जागतिक स्मरण दिवशी सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांतधिकारी मिनाज मुल्ला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोनवणे, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक प्रकाश गवळी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रमुख विनोद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
जितेंद्र पाटील पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील ३८ ब्लॅक स्पॉट्स पोलिसांनी शोधून काढले आहेत. त्या त्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते ठळकपणे दर्शविण्यात यावेत. मुख्यमंत्री यांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने राज्यभर आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे अपघात टाळता येऊ शकतात. दुर्दैवाने सीट बेल्ट न घालने, हेल्मेट न वापरणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे अशा प्रकारे कायदा मोडण्याचे काम केले जाते. मात्र असे न करता नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रुचेश जयवंशी म्हणाले, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपणास वाहतुकीच्या नियमाबाबत आठवण करून देणे हे महत्त्वाचे ठरते. छोटे छोटे नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. रस्ता ओलांडणे, सिग्नल पाळणे, चुकीच्या बाजूने न जाणे, सभ्य वर्तन आचरणात ठेवणे हे गरजेचे आहे. समीर शेख म्हणाले, वाहन वापर करणाऱ्या घटकांवर सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. वाहनांचा वापर निश्चित मार्गक्रमण करून इच्छित सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी करीत असतो. वाहन चालवताना आपण आपल्या चुकीमुळे दुसऱ्या कुटुंबाचे आयुष्यभरासाठी नुकसान करू शकतो याचे भान ठेवून वाहन चालविणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकात विनोद चव्हाण म्हणाले, ज्या चुकांमुळे अपघात घडले त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपघात ही मानवनिर्मित आपत्ती असून संपूर्ण जगामध्ये यातून मोठी जीवित व मालमत्तेची हानी होते. अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आणि दळणवळण या दरम्यान संपूर्ण सुरक्षा राखून कुटुंब व पर्यायाने समाज सुरक्षित राखणे महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवदिनी लाड यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी मानले.