सातारा पालिकेत विरोधकांची तीन दशके सत्ता होती. त्यावेळी काय विकासकामे झाली, हे सगळयांनाच ठाऊक आहे. त्यांनी ज्या विकासकामांचे आश्वासन दिले त्यांच्या फक्त घोषणाच झाल्या. सातारा विकास आघाडीने केवळ बोलले नाही तर करून दाखविले.
सातारा : सातारा पालिकेत विरोधकांची तीन दशके सत्ता होती. त्यावेळी काय विकासकामे झाली, हे सगळयांनाच ठाऊक आहे. त्यांनी ज्या विकासकामांचे आश्वासन दिले त्यांच्या फक्त घोषणाच झाल्या. सातारा विकास आघाडीने केवळ बोलले नाही तर करून दाखविले. त्यांनी आपली कामे सातारकरांसमोर मांडावीत, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता दिले.
खा. उदयनराजे भोसले प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, त्यांच्याकडे सुमारे ३० ते ३५ वर्षे नगरपालिका होती. त्यावेळी घोषणा झाल्याच. त्या घोषणांचे काय झाले? त्यावेळी सगळ्यांनी गढूळ पाणी पिले. त्या पाण्यात म्हैशी धुणे, प्रातविधीही त्यात व्हायचा. उघड्या पाटाने पाणी येत होते. कचरा कुंड्यांची विद्रुप स्वरुप सगळ्यांनी पाहिले आहे.
आम्ही कचरा कुंडीमुक्त साताऱ्याची घोषणा केली आणि ती पूर्ण केली. कासची पाईपलाईन टाकली आहे. आता नव्याने मोठी पाईपलाईन बसवण्याचे काम सुरु आहे. सातारा शहरातील पथदिवे बसविले आहेत. कास धरणासाठी दोन वर्षे पाठपुरावा केला आहे. सर्वात अवघड असणारी युनोस्कोची परवानगी मिळविली आहे. पाण्याचा, आरोग्याचा, गटाराचा प्रश्न निकालात काढत आहोत. भुयारी गटर योजनेचे काम काम सुरु आहे. काम करत असताना थोड्या अडचणी निर्माण होणारच. जादूची कांडी असती, अबरा का डबरा म्हंटलं की झाले, असे असते तर कधीच ही कामे झाली असती.
नागरिकांना निदर्शने करायला लावायची, हे किती योग्य आहे. काही दिवसांत वर्कऑर्डर दिल्यानंतर पाईपलाईनचे काम मार्गी लागेल. त्यानंतर पाणी, आरोग्य, संपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लागतील. हद्दवाढीतील टीडीआरची कामे सुरु होतील. घोषणा करणे सोपे आहे. पण, त्या अंमलात आणणे अवघड असते. कोण काय करते, कोणासोबत आहे, याला मी महत्व देत नाही. मी बोलतो ते करुन दाखवतो. पाणी आता सुरळीत मिळत आहे. पहिल्यासारखे हंडामोर्चा पहायला मिळत नाही. बुधवार नाक्याकडे पहिले खड्डे असायचे. कॉलेजमध्ये असताना मला ते डिझाईन आहे की पाहुणे येवू नयेत म्हणून असे केले आहे, असा प्रश्न पडायचा. आता मात्र ते खड्डे दिसत नाहीत.
आम्ही केवळ घोषणा देत नाही. काम करतो. नगरविकास आघाडी आणि भाजप. सातारा विकास आघाडीने जाहिरनाम्यात जी वचने दिली ती पूर्ण करत आणली आहेत. मी कोणतीही तुलना करत नाही. नगरविकास आघाडीने सातारा शहरातील लोकांसाठी काय काम केली आणि सातारा विकास आघाडीने काय काम केली, हे लोकांसमोर मांडावे. म्हणजे लोकांना कळेल, कोणी काय केले.
पालिकेची सध्याची इमारत कोणी बांधली, का बांधली, हेच मला कळत नाही. आताच तेथे लोकांना बसायला जागा नाही. उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांना जागा मागितली. त्यांनी विनामूल्य जागा दिली असून, तेथे इमारत होत आहे. मात्र, सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करत बसावे, हे मला उचित वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर बांधकाम थांबवतो. सातारकरांनी त्यासाठी सह्यांची मोहिम उभारावी, असे आव्हानही उदयनराजेंनी दिले.
हर्षवर्धन पाटील पालकमंत्री असताना कण्हेर धरणातून पाणी उचलणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आखली होती. १८ गावांची योजना होती. त्यातून उताराने हे पाणी साताऱ्यासह सदरबझार, सैदापूर व शिवराज फाट्यापर्यंत मिळणार होते. मात्र, ही योजना विरोधकांनी हाणून पाडली. ती योजना झाली असती तर यापूर्वीच लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असती. मात्र, त्यांनी शहापूर योजना राबवून दोन टप्प्यात पाणी उचलणे सुरु केले. त्याचे विद्युत बील पालिकेला, लोकांना परवडत नाही. मात्र, कासचे तसे नाही.
नावे कोणीही ठेवू शकते. मला काहीही वाटले म्हणून निधी मिळत नाही. नियमात बसले तरच निधी मिळतो. ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक सुरळीत होत आहे. कोंडी सुटली आहे. भविष्याचा विचार करुन ते बनवले आहे. एक दिवस ग्रेड सेपरेटर बंद करु, बघूयात काय होते? पहिले म्हणत होते की, स्विमिंग टँक होणार. त्यात पाणी तरी साठते का, असा सवालही उदयनराजेंनी केला.


