साताऱ्यात भीमशक्ती संघटनेचे धरणे आंदोलन
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या अनुदान प्राप्तीची केली मागणी
महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निराधार योजनेचे अनुदान दिलेले नाही. ते तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सातारा : महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निराधार योजनेचे अनुदान दिलेले नाही. ते तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संघटनेच्या वतीने बाळासी शिरसट, राज रतन कांबळे, सौ सुनीता ढेकळे, अरुण पवार, दयानंद बनसोडे, आशा बोभाटे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यासह संघटनेचे शंभर आंदोलक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र शासनाचे श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे गेल्या तीन महिन्यापासून लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. संघटनेच्या वतीने सहा महिन्यापूर्वी याच विषयातून आंदोलन झाले होते. दोन महिने वेळेत अनुदान झाले. मात्र पुन्हा तोच प्रकार नव्याने सुरू झाला आहे. अनुदानात वाढ होऊनसुध्दा ती वाढ अद्याप लाभार्थ्यांना मिळाली नाही. या अनियमिततेमुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची अतोनात हाल होत आहेत.
तलाठी, मंडलाधिकारी या योजनेची अंमलबजावणी करताना प्रचंड टाळाटाळ करतात, असा आरोप संघटनेने केला आहे. या योजनेपासून लाभार्थी वंचित ठेवले जात आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून तलाठी व सर्कल यांना तत्काळ आदेश करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.


