maharashtra

तेजोमयी उत्सवाची आजपासून जल्लोषी सुरवात

लक्ष्मीपूजन व नरक चर्तुदशीच्या पारंपारिक स्वागताचा उत्साह

The glorious celebration begins from today
सातार्‍यात यंदा दिवाळी जोरदार होणार असून बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे. कोरोनाचा जिल्ह्यातील संसर्गदर दीड टक्क्यांवर आला असल्याने सातारकरांनी भीती बाजूला ठेऊन दिवाळीची खरेदी, पणत्यांची आरास आणि लक्ष्मी पूजनाच्या पारंपारिक स्वागताची तयारी केली आहे.

सातारा : कोरोनाची स्मृती बाजूला ठेवत तेज आणि जल्लोष यांची उधळण करणार्‍या दीपोत्सवाची उद्या गुरुवारपासून सुरवात होत आहे. या तेजोमय महोत्सवाच्या स्वागतासाठी सातारकर आतुर असून संपूर्ण सातारा शहर आकाश कंदिल आणि दिव्यांच्या तेजात लखलखले आहे. कोरोनाची भीती संपूर्णपणे बाजूला ठेऊन सातारकरांनी मात्र आज खरेदीवर जोर दिला आहे. 
सातार्‍यात यंदा दिवाळी जोरदार होणार असून बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे. कोरोनाचा जिल्ह्यातील संसर्गदर दीड टक्क्यांवर आला असल्याने सातारकरांनी भीती बाजूला ठेऊन दिवाळीची खरेदी, पणत्यांची आरास आणि लक्ष्मी पूजनाच्या पारंपारिक स्वागताची तयारी केली आहे. यंदा नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन गुरूवारी (दि. 4) आले आहे. अश्विन अमावस्या पहाटे साडेतीन वाजता सुरू होत असून चित्रा नक्षत्राचा हा दिवस शुभ मानला जातो. यंदा लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सायं 6 ते रात्री 8.34 पर्यंत आहे. सायंकाळी साडेसात पर्यंत अमृत मुहूर्त असल्याने या दरम्यान लक्ष्मी पूजन करावे हे ब्रह्मवृंदांनी कळविले आहे. नरक चतुर्दशी सुद्धा गुरुवारीच आल्याने वामनासह सहा इष्ट देवतांच्या पूजेचे महत्व आहे. यमदीपदानं म्हणून घराचे आवार दिव्यांनी उजळविण्याची परंपरा आहे. या पूजेचा मुहूर्त सकाळी 6.15 ते 8.30 व सायंकाळी 7.00 ते 8.45 पर्यंत आहे. सातारकरांनी पारंपारिक पध्दतीने दिवाळीच्या स्वागताची तयारी केली आहे. दोन वर्ष लॉकडाऊन व कोरोना संसर्गाची भीती यामुळे यंदाच्या दिवाळीचा उत्साह प्रचंड आहे. विविध प्रकारचे आकाशकंदिल, आकर्षक पणत्या, सुगंधी तेलं व साबण, उटणे, खास भेटवस्तू, मिठाई व फराळाचे बॉक्स याची भरभरून खरेदी सातारकरांनी केली आहे. 
राजपथावर देवी चौक ते मोती चौक आणि खणआळी येथे मंगळवारी रात्रीपासून सातारकरांच्या गर्दीमुळे पाय ठेवायला जागा नाही. अरूंद रस्त्यामुळे मोती चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून ट्रॅफिक पोलीसांची दमछाक होत आहे. कर्मवीर पथावर सुध्दा नागरिक रस्त्यांवर असल्याने गर्दीच गर्दी जाणवत आहे. आकाशकंदिल, कपडे पणत्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या खरेदीची बाजारपेठेत धूम सुरू आहे. घरा-घरातून फराळाचा घमघमाट जाणवत असून यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार, हे निश्चित दिसत आहे.