कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांना धक्का बसला आहे. ही पतसंस्था गेली काही दिवस बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेच्या ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी कराड शहर पोलीस स्टेशन गाठले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
कराड : ऐन दिवाळीच्या तोंडावर कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांना धक्का बसला आहे. ही पतसंस्था गेली काही दिवस बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेच्या ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी कराड शहर पोलीस स्टेशन गाठले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची 25 वर्षांपूर्वी कराड शहरात स्थापना करण्यात आली. बहुतांशी व्यापारी वर्ग या संस्थेची जोडला गेला होता. गेल्या अनेक वर्षीत संस्था नावारूपाला आली होती. या संस्थेत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा झाल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून या पतसंस्थेबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असतानाच या पतसंस्थेला टाळे लागल्याचे सभासद व ठेवीदारांच्या निदर्शनास आल्याने गोंधळ निर्माण झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही संस्था व संस्थेचा व्यवहार ठप्प असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक ठेवीदारांनी उपनिबंधकांकडे धाव घेत ठेवी परत मिळण्याबाबत निवेदन दिले आहे.
दरम्यान पतसंस्थेच्या ठेवीदार व सभासदांची नुकतीच एक मीटिंग घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने सभासद ठेवीदार उपस्थित होते .या सर्वांनी संस्थे विरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पतसंस्थेचे ठेवीदार सभासद मोठ्या संख्येने कराड शहर पोलीस स्टेशनला एकत्र येत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
शहर पोलीसात दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची चौकशी करून सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. सदर पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांच्या ठेवी, बचत, रीकरिंग, भागभांडवल अशा स्वरूपात असून संचालक मंडळाने विशेषता पतसंस्थेचे चेअरमन शरद गौरीहर मुंढेकर यांनी संस्थेस टाळा लावला आहे. यास्तव आमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चेअरमन किंवा कोणीही संचालक भेटत नाहीत. अर्थात पतसंस्था बुडाली की काय? असा संशय आम्हास आहे. आपण आपल्या अधिकारांमध्ये संस्थेची चौकशी करावी व प्रशासक नेमून आम्हा ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उदय हिंगमिरे, शाहिबाज आगा, गौतम करपे, दत्ता तारळेकर, दिलीप पाटील यांच्यासह महिला ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


