प्राधिकरणाने शाहूपुरीतील नवीन नळ कनेक्शनबाबत तातडीने निर्णय घ्यावा
अन्यथा जनतेच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल : शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचा इशारा
शाहूपुरी भागातील जुन्या ग्राहकांना नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कनेक्शन शिफ्टिंग करुन देत असतानाच ज्या नागरिकांना नवीन कनेक्शन हवे आहे. त्यांना ती त्वरीत देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल असा इशारा शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनास दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याबाबत आघाडीने मांडलेल्या मुद्यांशी प्राधिकरण सहमत असून याप्रश्नी आगामी काळात तातडीने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
सातारा : शाहूपुरी भागातील जुन्या ग्राहकांना नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कनेक्शन शिफ्टिंग करुन देत असतानाच ज्या नागरिकांना नवीन कनेक्शन हवे आहे. त्यांना ती त्वरीत देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल असा इशारा शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनास दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याबाबत आघाडीने मांडलेल्या मुद्यांशी प्राधिकरण सहमत असून याप्रश्नी आगामी काळात तातडीने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी भारत भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा राजेंद्र केंडे, निलम देशमुख, माधवी शेटे, माजी उपसरपंच विकास देशमुख, सुरेश शेटे उपस्थित होते.
याबाबत प्राधिकरणाचे उपअभियंता जंगम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत शाहूपुरी परिसरात नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजना अंतर्गत जुन्या ग्राहकांसाठी कनेक्शन शिफ्टिंगचे काम सुरू आहे. ही कामे होत असताना बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट अशी झाली आहे. याचवेळी जर नवीन ग्राहकांना त्यांची कनेक्शन मंजूर करून कनेक्शन शिफ्टिंगची व्यवस्था केली तर भविष्यात पुन्हा नव्याने रस्ते खोदाई करावी लागणार नाही तसे न झाल्यास नागरिकांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागेल व रस्त्तेदुरुस्तीसाठी खर्च झालेल्या पैशाचा सुध्दा अपव्यय होणार आहे अशी नागरिकांची भूमिका आहे.
नागरिकांची भूमिका घेऊन शाहूपुरी ग्रामविकास आघाडीने दि. 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.परंतु, याप्रश्नी अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने आता शाहूपुरीतील नागरिकांच्या सहनशीलतेचा जास्त अंत पाहू नये.आपल्या नाकर्तेपणामुळे जर भविष्यात जनतेतून याप्रश्नी उद्रेक झाल्यास याच्या परिणामांची सर्व जबाबदारी ही संबंधित अधिकारी व विभागाची असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
खाजगीरित्या फॉर्म वाटपास प्राधिकरणाची परवानगी नाही
याचबरोबर शाहूपुरी परिसरात काही खाजगी लोक कनेक्शनच्या नवीन परवानगीसाठी वैयक्तिक पातळीवर अर्ज वाटप करुन स्वतः कडे जमा करून घेत आहेत. याबाबत आपल्या पाणी पुरवठा विभागाने अशी खाजगी यंत्रणा नेमली आहे का? व असेल तर तसे संबंधितांना निर्गमीत केलेले लेखी आदेश दाखवावेत, अशी मागणीही या चर्चेवेळी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
भारत भोसले यांनी मुख्य कार्यकारी अभियंता सौ.चौगुले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून या सर्व प्रश्नांची गांभीर्यता लक्षात आणून दिली. यावर मुख्य कार्यकारी अभियंता चौगुले व उपअभियंता जंगम यांनी अशी कोणतीही खाजगी यंत्रणा नवीन कनेक्शन फॉर्म वाटपासाठी खात्याने नेमलेली नसून जर कोणी असे बेकायदेशीर कृत्य करीत असेल तर नागरिकांनी त्याला बळी पडू नये यामध्ये फसवणूक झाल्यास प्राधिकरण त्यास जबाबदार नसेल. तसेच, याबाबतच्या संबंधित व्यक्तीची लेखी तक्रार प्राधिकरणाकडे करावी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.


