जळगाव ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कोरेगाव : जळगाव ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, पौर्णिमेश ऊर्फ किरण संजय भोसले, मनोज उत्तम शिडतुरे, रोहन सुभाष भोसले (सर्व रा. जळगाव, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या वर्षीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याचा राग मनात धरून संशयितांनी तलवार व कोयत्याचे वार करून वैभव यांचा खून केल्याची फिर्याद वैभव याचा भाऊ शुभम विकास ढाणे (रा. जळगाव, ता. कोरेगाव) यांनी पोलिस ठाण्यात दिली. गुरुवारी (दि. 31) रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास जळगाव हद्दीतील भैरोबा मंदिरासमोर प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे, रोहन सुभाष भोसले यांनी बेकायदा जमाव जमवला. यानंतर प्रशांत भोसलेने तलवारीने, तर सौरभ भोसलेने कोयत्यासारख्या हत्याराने वार करून, तसेच इतरांनी मारहाण करून वैभव ढाणे यांचा खून केला. प्रशांत भोसले व वैभव यांच्यात गावात वाळू काढण्याच्या कारणावरून वाद होते. मागील वर्षी वैभवने चाकूने प्रशांतवर वार केले होते. त्यात प्रशांत गंभीर जखमी झाला होता.
त्याने दिलेल्या तक्रारीवरून वैभव व त्याच्या मित्रांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून प्रशांत भोसले हा वैभववर चिडून होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पौर्णिमेश ऊर्फ किरण भोसले, मनोज शिरतोडे, रोहन भोसले या तिघांना पोलिसांनी काल (दि. 1) रोजी रात्री उशिरा अटक केली. न्यायालयाने या तिघांनाही सहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रशांत पांडुरंग भोसले व सौरभ संजय भोसले या दोघांना आज अटक झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांची संख्या पाच झाली असून, पोलिस निरीक्षक सावंत अधिक तपास करीत आहेत.


