डिजिटल युगात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत असून त्यांचे ज्ञान असणारे सक्षम नेतृत्व करु शकतील असेच सरपंच, सदस्य असले पाहिजेत. गावच्या विकासासाठी लोकसहभाग श्रमदानाची स्वयंस्फूर्तीने साथ मिळत गेल्यास ग्रामपंचायतीच्या कामाचा लौकिक सर्वदूर पोहचेल, असा विश्वास पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी व्यक्त केला.
सातारा : डिजिटल युगात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत असून त्यांचे ज्ञान असणारे सक्षम नेतृत्व करु शकतील असेच सरपंच, सदस्य असले पाहिजेत. गावच्या विकासासाठी लोकसहभाग श्रमदानाची स्वयंस्फूर्तीने साथ मिळत गेल्यास ग्रामपंचायतीच्या कामाचा लौकिक सर्वदूर पोहचेल, असा विश्वास पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी व्यक्त केला.
दहिवडी कॉलेज व रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दहिवडी कॉलेज येथील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी ओळख ग्रामपंचायतीच्या कामकाजाची ही एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य सुरेश साळुंखे यांच्या हस्ते तर उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. जे. बरकडे, नॅक विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. एन. दडस यांच्या उपस्थितीत झाले.
पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी मार्गदर्शन करताना, गावाचा सर्वागीन विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्व आणि गावात राहणारे उमेदवार असावेत. ज्यांना सरपंच, सदस्य होण्याची इच्छा आहे, अशांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची आधीच माहिती घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले. दहिवडी कॉलेजने लोकशाही सक्षम होण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायतीच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी हि कार्यशाळा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. त्यानी मार्गदर्शन करताना अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी सांगून गावाचा सर्वांगीण विकास करण्याची गावातील प्रत्येकाचा सक्रिय सहभाग असावा, हे पटवून दिले. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी परिपूर्ण माहिती त्यांनी उदाहरणांसह समजावून दिली.
दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक सुनिल भस्मे यांनी ग्रामपंचायतीची लेखासंहिता सांगून ग्राम, महिला, मासिक आणि वॉर्ड सभा याबद्दल माहिती दिली. शेवटी शंकानिरसन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.भक्ती पाटील तर आभार प्रा.दत्तात्रय मांजरे यांनी मानले.


