maharashtra

सहकारी कायद्यानुसार शेखर चरेगावकर अपात्र

यशवंत बँकेच्या सभासदांनी केली राजीनाम्याची मागणी

कर्ज थकवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात पदाधिकारी राहता येत नाही. त्यामुळे त्यांना बँकेच्या चेअरमन पदावरून निरस्त करण्यात यावे, अशी तक्रार बँकेचे सभासद संजीव कुलकर्णी, विनोद कदम, संदीप पासलकर यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.

सातारा : यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व यशवंत प्रतिष्ठान चे प्रमुख कार्यकारी व सहकार भारती सहकारी प्रशिक्षण संस्थेचे मुख्य सचिव शेखर चरेगावकर यांच्या विरोधात वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने 5 कोटी 45 लाख 973 रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७३ सीए कलमातील खंड एक प्रमाणे कर्ज थकवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात पदाधिकारी राहता येत नाही. त्यामुळे त्यांना बँकेच्या चेअरमन पदावरून निरस्त करण्यात यावे, अशी तक्रार बँकेचे सभासद संजीव कुलकर्णी, विनोद कदम, संदीप पासलकर यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती साताऱ्यात एडवोकेट अमित द्रविड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ते पुढे म्हणाले, यशवंत सहकारी बँकेच्या अडीचशे कोटी रुपयांच्या ठेवी असून त्याचे सातारा, कराड, फलटण येथे कार्यालय आहेत. या बँकेच्या चेअरमन पदी असणारे शेखर चरेगावकर यांच्या विरोधात वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने 9 डिसेंबर 2022 रोजी पाच कोटी 45 लाख 973 चे कर्ज थकवल्या प्रकरणी 1960 चे कलम 101 नुसार वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. तसेच सारस अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कर्वेनगर पुणे यांनी सुद्धा थकीत 56 लाख 9171 रुपयाच्या वसुलीपोटी दहा नोव्हेंबर 2020 रोजी वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 अन्वये जी व्यक्ती कर्जफेडीसाठी कसूरदार असते त्या व्यक्तीला कोणत्याही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात पदाधिकारी होता येत नाही. यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर यांच्याकडे सहकार भारती सहकारी प्रशिक्षण संस्था याचे सचिव पद आणि यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकारी पद आहे. यशवंत बँकेच्या ठेवीदारांनी याची तक्रार सहकार आयुक्त तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे यापूर्वीच केली आहे. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत लेखी परीक्षण प्रक्रियेत सुद्धा संबंधित पॅनेलला या संदर्भातील तक्रारीनुसार अवगत करण्यात आले आहे. यशवंत बँकेचे चेअरमन पद, सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे सचिव पद व यशवंत प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यकारी पद या पदावरून त्यांना निरस्त करण्यात यावे, अशी मागणी यशवंत बँकेचे सभासद यांनी 17 जानेवारी 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. यशवंत बँकेच्या सभासदांना या प्रकाराची माहिती व्हावी याकरिता बँकेच्या सभासदांनी पत्रकार परिषद घेऊन चरेगावकर यांना डिफॉल्टर घोषित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.