maharashtra

वनमजुरांना शासन सेवेत कायम करा

महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार, वनपाल आणि जनरल युनियनची मागणी

Maintain forest workers in government service
वनमजुरांना शासन सेवेत कायम करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार, वनपाल आणि जनरल युनियनने सातारा नगरपालिका ते पवई नाका येथे विनंती पायी मोर्चा काढुन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. उद्या गुरुवार दि. ३ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती युनियनने दिली.

सातारा : वनमजुरांना शासन सेवेत कायम करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार, वनपाल आणि जनरल युनियनने सातारा नगरपालिका ते पवई नाका येथे विनंती पायी मोर्चा काढुन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. उद्या गुरुवार दि. ३ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती युनियनने दिली.
युनियनने दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, वन विभागामध्ये सन १९८९ ते २०२२ अखेर पर्यंत वनमजुर सलग पद्धतीने काम करीत आहेत. मात्र  घटनाबाह्य चुकीच्या शासन निर्णयामुळे अनेक वनमजुर वन विभागामध्ये शासन सेवेत कायम करण्याच्या फायद्यापासून वंचित राहिलेले आहेत. आजही ते शासन सेवेत कायम होण्याच्या अपेक्षेने तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. याबाबत युनियनच्या माध्यमातून अनेक वेळा उपोषण, धरणे आंदोलन करून वारंवार पत्रव्यवहार करून देखील आपणाकडुन व मजुरांच्या प्रश्नांवर अद्याप कोणताही तोडगा किंवा ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही वनमजुर वयाच्या अटीतून निघून गेले आहेत तर काहींचा मृत्यू झाला आहे. पुन्हा एकदा आमच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सातारा, सांगली व नागपूर जिल्ह्यातील वनमजुर व त्यांच्या नातेवाईकांनी सहकुटुंब सहपरिवार आज सकाळी बुधवारी येथील नगरपालिके समोर असणाऱ्या डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विनंती मोर्चास प्रारंभ केला. कोयना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन प्रवेशद्वाराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.