बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद
दुसर्या गुन्ह्यात आत जावून पोलिसांनाच चकवण्याचा प्रयत्न; तब्बल 134 सीसीटीव्ही फुटेज तपासले
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फोडजार्इ मंदिराच्या पटांगणात कुटुंबासमवेत झोपलेल्या पारधी समाजातील चिमुरड्या मुलीला दुचाकीवरुन घेवून तिच्यावर अत्याचार करणार्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फोडजार्इ मंदिराच्या पटांगणात कुटुंबासमवेत झोपलेल्या पारधी समाजातील चिमुरड्या मुलीला दुचाकीवरुन घेवून तिच्यावर अत्याचार करणार्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाने बलात्कारच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी त्याच्यावर अगोदर दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात तो शाहूपुरी पोलिसांना शरण गेला होता व तो न्यायालयीन कोठडीत होता. इकडे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक त्याला शोधण्यासाठी जीवाचे रान करत होते. तब्बल 134 सीसीटीव्ही फुटेज यासाठी तपासण्यात आले होते. तोच आरोपी दुसर्या गुन्ह्यात पोलिसांना शरण जावून त्यांनाच चकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला अटक करण्यात आली असून संकेत गुजर असे संशयित आरोपीचे नाव आहे.
क्रांतीकारी, ऐतिहासिक सातारा जिल्ह्याने देशाला दिशा दिली आहे. मात्र, देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या सातारा जिल्ह्यात पारधी समाजाचे पुनर्वसन मात्र झालेले नाही. सातारा शहरात मार्केटयार्ड, बसस्थानक परिसर, तहसील कार्यालय परिसर आणि नव्याने पारधी समाजातील काही कुटुंबे चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावर रहात असतात. पारधी समाजातील या माणसांचा सर्वांना राग येतो मात्र त्यांना घर मिळवून देण्यासाठी शासनाची योजना असताना साधे घरकूल मिळवून देण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नाही. जिल्हाधिकारी या पारधी समाजातील लोकांना सलाम घालूनच कार्यालयात जात असतात मात्र त्यांना देखील या लोकांना घरे मिळवून द्यावी, रोजगार उपलब्ध करुन द्यावा असे वाटत नाही.
दि. 21 रोजी सोमवारी पहाटे ही घटना घडली. भल्या पहाटे तो हाक मारून तिला जागे करतो... त्याला बघून ती हातानेच लांब हो म्हणून सांगते... तो तरीही तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो तेवढ्यात कुटूंबातील कोणी हालचाल करतो आणि तो तिथून निघून जातो... पोलिसांकडे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील दोन मिनिटांच्या या फुटेजनंतरच तो नराधम तिथेच अन्यत्र असलेल्या चिमुकलीला घेऊन गेल्याचा पोलिसांचा कयास होता व तो अखेर खराही ठरला आहे. सातारा शहरात मध्यवस्तीत शासकीय कार्यालयाच्या आडोशाला झोपलेल्या चिमुरडीला तिथून गाडीवर नेऊन तालुका हद्दीत तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली.
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला होता. या चिमुरडीवर सातार्यात उपचार केल्यानंतर तिला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली आहे. इकडे या घटनेचा निषेध करुन बालिकेवर बलात्कार करणार्या नराधमास अटक करण्याची मागणी अनेक संघटना करत होत्या. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी नराधमाचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करत होते. मात्र, आरोपी हातास लागत नव्हता. दोन दिवसांपूर्वी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीचे वर्णन जुळणारी व्यक्ती चक्क पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समोर आल्यावर पोलीस देखील चक्रावून गेले. बालिकेवर बलात्कार नराधमाचे नाव संकेत गुजर असून याची खात्री पटल्यानंतर त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मात्र, तो ही घटना घडल्यावर त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात तो स्वत:हून शाहूपुरी पोलिसांना शरण गेला होता आणि न्यायालयीन कोठडीत होता.
बालिकेवर बलात्कार करणारा हाच नराधम असल्याची खातरजमा झाल्यावर त्याला आता सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तब्बल पाच दिवसांनी या गुन्ह्याचा तपास अशा धक्का देणार्या पध्दतीने लागला आहे.
संकेत गुजरची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीच राहिलेली आहे. आतापर्यंत सुमारे 17 केसेस या पठ्ठ्याच्या नावावर आहेत. पण त्या भुरट्या चोर्यांच्याच आहेत. लहानपणीच याची नाशिकच्या बालसुधारगृहात तीन वर्षासाठी रवानगीही झाली होती. मात्र तेथूनही या महाशयांनी पलायन केले. यानंतर पोलिसांना हा पुण्यात सापडल्यानंतर त्याची रवानगी पुन्हा नाशिकच्या बालसुधारगृहात करण्यात आली.
वडिलांनी घेतली न्यायाची बाजू
सातारा पोलिसांची सर्व पथके अहोरात्र या आरोपीचा शोध घेत असतानाच पोलिसांना त्याचे मिळालेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्रसारमाध्यमांना व्हायरल करायला सांगितले होते. त्या पद्धतीने माध्यमकर्मींनी ते व्हायरल केलेही. त्याचा योग्य तोच परिणाम दिसून आला. हे फुटेज संकेतच्या भावाने आपल्या मोबाईलवर पाहिले. त्याने पाहिल्यानंतर ते आपल्या वडिलांना दाखवले. वडिलांनी ते पाहिल्यानंतर मुलाला पाठिशी न घालता त्या पित्याने न्यायाची बाजू उचलीत तडक पोलीस स्टेशन गाठले. तेथे त्यांनी फुटेज ओळखल्याचे सांगितल्यानंतर खर्याअर्थाने पोलिसांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले.


