maharashtra

ज्येष्ठ नेत्यांकडून घोटाळ्याचे रोपटे साताऱ्यात लावण्याचा प्रयत्न सुरू 

लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार सभा घेणार आहेत."

सातारा : "माझ्या विरोधात त्यांना इतक्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही, आता ते घोटाळ्याचे रोपटे जिल्ह्यात लावण्याचा प्रयत्न करत आहेत," अशी टीका करून लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार सभा घेणार आहेत."
सातारा येथे आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते.
खा. उदयनराजे म्हणाले, "काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीला लोकांसमोर जाऊन मते मागण्याची नैतिकता राहिली नाही. या पक्षाला जनतेने पाठिंबा दिला, त्या पाठिंबाच्या बळावर देशाला ५० वर्ष मागे खेचण्याचे पाप या पक्षाने केले आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना नैतिकता नसलेले लोक विरोधाला विरोध करत लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. २१व्या शतकात मोठी स्पर्धा जास्तीत जास्त विकासकामे झाली पाहिजेत, त्यासाठी एकी महत्त्वाची आहे. वेळ गेली की पुन्हा ती येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कामे मार्गी लागायचे असतील तर स्थिरता अत्यंत गरजेची आहे. राज्यात, केंद्रात स्थिर सरकार असेल तर विकासकामे झपाट्याने होतील. स्वार्थापोटी सरकारमध्ये एकत्र आलेले लोक लोकांचा विकास कधीच साधू शकत नाहीत. त्यामुळे आपण अत्यंत सावधगिरीने पुढची पाऊले टाकली पाहिजेत."

माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य
जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे. चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवण्याची हिंमत माझ्यात आहे. माझ्या गळ्यात कमळ आहे. हातात घड्याळ तर खांद्यावर धनुष्यबाण आहे. त्यामुळे या सर्व महायुतीच्या ताकदीच्या जोरावर भविष्यात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार निवडून येतील, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.