धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते, आ. अजित पवार यांच्या पुतळ्याचा सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला.
सातारा : धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते, आ. अजित पवार यांच्या पुतळ्याचा सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला. तसेच अजित पवार यांनी सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या असून त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना साताऱ्यात फिरू न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते, आ. अजित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात असे आ. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल राज्यभरात प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा येथील किल्ले अजिंक्यतारावर भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आ. अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला. आ. अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. तसेच अजित पवार यांनी सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या असून त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना साताऱ्यात फिरू न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.