maharashtra

चकाचक रस्त्यावर पालिकेकडून डांबरीकरण


Asphalting on shiny roads by the municipality
सातारा पालिकेने शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याने काही रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. मात्र, शुक्रवारी गुरुवार पेठेतील चकाचक रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे डांबरीकरण न करता चांगल्या रस्त्यावर पैशांची उधळपट्टी कशासाठी? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

सातारा : सातारा पालिकेने शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याने काही रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. मात्र, शुक्रवारी गुरुवार पेठेतील चकाचक रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे डांबरीकरण न करता चांगल्या रस्त्यावर पैशांची उधळपट्टी कशासाठी? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहरातील राजपथ, खालचा रस्ता व राधिका रोड वगळता इतर सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पालिकेकडून काही महिन्यांपूर्वी  मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याने नागरिक व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अद्यापही चार भिंतीकडे जाणारा मार्ग, शाहू चौक ते बोगदा, समर्थ मंदिर चौक ते राजवाडा, अर्कशाळा ते शाहूपुरी चौक, मंगळवार तळे मार्ग तसेच हद्दवाढ झालेल्या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. येथील रस्त्यांचे प्राधान्याने डांबरीकरण करणे गरजेचे असताना पालिकेकडून शुक्रवारी चकाचक रस्त्यावर डांबर टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कमानी हौद ते शेटे चौक हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त आहे. तीन-चार ठिकाणी पडलले खड्डे वगळता संपूर्ण रस्ता गुुळगुळीत आहे. पालिकेकडून येथील केवळ खड्डे मुजविणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता संपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरणाचा घाट घालण्यात आला. ज्या ठिकाणी डांबरीकरणाची गरज आहे, तेथे डांबरीकरण न करता नको त्या रस्त्यांवर शासनाच्या महसूल खर्च करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न नागरिकांमधूून उपस्थित केला जात आहे.