हरिहरेश्वर बँकेच्या दीड हजार खातेदारांची तब्बल चाळीस कोटीची फसवणूक विद्यमान संचालकांनी केली आहे. 29 पैकी केवळ 5 संचालकांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, मात्र आरोपी समोर असूनही पोलीस मात्र अटकेची कारवाई करत नाही. या संपूर्ण घोटाळ्याचा प्रवर्तन संचालनालय अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण मार्फत करण्यात यावा, अशी मागणी हरिहरेश्वर बॅक खातेदार कृती समिती च्या वतीने पत्रकार परिषदेत केली.
सातारा : हरिहरेश्वर बँकेच्या दीड हजार खातेदारांची तब्बल चाळीस कोटीची फसवणूक विद्यमान संचालकांनी केली आहे. 29 पैकी केवळ 5 संचालकांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, मात्र आरोपी समोर असूनही पोलीस मात्र अटकेची कारवाई करत नाही. या संपूर्ण घोटाळ्याचा प्रवर्तन संचालनालय अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण मार्फत करण्यात यावा, अशी मागणी हरिहरेश्वर बॅक खातेदार कृती समिती च्या वतीने पत्रकार परिषदेत केली.
या घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहनं करण्याचा इशारा समिती च्या वतीने नितीन सावंत यांनी दिला.
सावंत पुढे म्हणाले, हरिहरेश्वर बँकेच्या वाई भुईंज वडूथ खंडाळा अशा चार शाखा असून येथील दीड हजार खातेदारांची तब्बल चाळीस कोटीची फसवणूक विद्यमान संचालकांनी गैरव्यवहारांद्वारे केली आहे. या प्रकरणी एकूण 29 जणांवर वाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी सनदी लेखापाल राहुल धोंगडे, डी बी. खरात, एन एस कदम, संचालक जयश्री चौधरी, संतोष चोरगे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होऊनही चार महिने उलटले तरी पोलिसांकडून एकाही आरोपीला अटक केलेली नाही. बॅकेचा सर व्यवस्थापक रमेश दगडू जाधव याला आम्ही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तरी त्याला अटक करण्यात आली नाही. उलट आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिसांनी दिली. पोलीस व जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडून कोणतेही सहकार्य होत नसून ठेवी अडकल्याने खातेदार प्रचंड आर्थिक विवंचनेत आहेत. गृहराज्यमंत्री व पोलीस अधीक्षकांना वारंवार पत्रव्यवहार व ऑनलाईन तक्रार करूनही त्या सर्व पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आल्याची तक्रार सावंत यांनी केली. बॅकेचे चेअरमन विश्वस्त व सर्व व्हॅल्युएटर या सर्वाना पोलिसांनी अटक करावी अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे.


