कोरोना संक्रमण वेगाने वाढू लागल्याने सातारा पालिकेने देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पथकाने पहिल्याच दिवशी राजवाडा परिसरात विनामास्क फिरणाऱ्या दोघांवर कारवाई करून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला.
सातारा : कोरोना संक्रमण वेगाने वाढू लागल्याने सातारा पालिकेने देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पथकाने पहिल्याच दिवशी राजवाडा परिसरात विनामास्क फिरणाऱ्या दोघांवर कारवाई करून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, गेल्या पाच दिवसांत सातारा तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत असताना नागरिक, व्यापारी व विक्रेत्यांकडून कोरोना नियमावलीचे पालन केले जात नाही. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळते. फिजिकल डिस्टन्सचा सर्वत्र फज्जा उडत असतो. बहुतांश वाहनचालक व नागरिक मास्क वापरण्याची तसदीही घेत नाहीत. हा प्रकार सातत्याने निदर्शनास येत असल्याने पालिकेच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
कोरोना विभाग प्रमुख प्रणव पवार यांच्या पथकाने गुरुवारी राजवाडा परिसरात ही मोहीम राबवून मास्क नसलेल्या दोघांवर कारवाई केली. संबंधितांकडून प्रत्येकी पाचशे असा एक हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. शुक्रवारपासून दररोज सकाळी ११ ते १ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पालिकेची पथके शहरात फिरणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.


