सत्ता आणि पदे मिळूनही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला विश्वासाने मंत्रिपद दिले, त्यांच्याकडे बोट दाखवता आणि तुम्ही काय करता ? मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अडीच वर्षात किती वेळा तोंड दाखवले ? असे उघड सवाल मतदारांकडून त्यांना केले जात आहेत.
सातारा : सत्ता आणि पदे मिळूनही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला विश्वासाने मंत्रिपद दिले, त्यांच्याकडे बोट दाखवता आणि तुम्ही काय करता ? मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अडीच वर्षात किती वेळा तोंड दाखवले ? असे उघड सवाल मतदारांकडून त्यांना केले जात आहेत.
बंडखोरांच्या यादीत शंभूराज देसाई यांचे नाव आल्यापासून मतदार संघात वातावरण ढवळून निघाले आहे. ज्या लोकांनी आजवर शिवसेनेचा वाघ म्हणून मते दिली त्याच लोकांकडून तिखट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी देसाईंच्या निष्ठेचे धिंडवडे काढले आहेत. आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो पण त्यांची निष्ठा रोज बदलत असेल तर त्यात आपली नाचक्की किती ? आपण तळागाळात काम करतो, लोकांना काय उत्तरे द्यायची असे सवाल कार्यकर्ते करत आहेत.
देसाई यांच्या तोंडात इतक्या वर्षात शिवसेनेचे कधी नाव नव्हते. आता मंत्रीपद मिळाल्यावर शिवसेनेचे नाव आठवायला लागले आहे. मल्हार पेठच्या कदम यांनी तालुक्यात जितक्या शाखा काढल्या, तितक्या तरी शाखा देसाई यांनी काढल्या आहेत का ? यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत तालुक्यात शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे आमचे मत शिवसेनेलाच असेल असे एका कार्यकर्त्याने उद्विग्नपणे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवतात पण स्वतः मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून देसाई यांनी अडीच वर्षात लोकांना तोंड दाखवले नाही. त्यांच्यासाठी आम्ही आईभणी काढून घ्यायच्या, मारामाऱ्या करायच्या आणि त्यांनी आज इथे, उद्या तिथे करत फिरायचे हे संतापजनक आहे. प्रमुख कार्यकर्त्यांच्या निधनानंतरही यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या नाहीत. तुम्ही इतरांकडे बोट दाखवता, आम्ही तुमच्याकडे किती वेळा बोटे दाखवायची अशी सरबत्ती कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत.


