maharashtra

औंध येथील सदाशिव यादव यांचे मरणोत्तर नेत्रदान

यादव कुटुंबियांच्या निर्णयामुळे एका रुग्णाला मिळणार आयुष्य पाहण्याची संधी

Posthumous eye donation of Sadashiv Yadav from Aundh
अल्पशा आजाराने येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या सदाशिव यादव यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये एका रुग्णाला दोन्ही निकोप डोळ्यांची आवश्यकता होती. याबाबतची माहिती देऊन  वैद्यकीय पथकाने यादव कुटुंबीयांना सदाशिव यादव यांचे मरणोत्तर नेत्रदान करावे, अशी विनंती केली असता यादव कुटुंबीयांनी त्याला तात्काळ होकार दिल्यानंतर सदाशिव यादव यांचे नेत्रदान झाले.

सातारा : अल्पशा आजाराने येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या सदाशिव यादव यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये एका रुग्णाला दोन्ही निकोप डोळ्यांची आवश्यकता होती. याबाबतची माहिती देऊन  वैद्यकीय पथकाने यादव कुटुंबीयांना सदाशिव यादव यांचे मरणोत्तर नेत्रदान करावे, अशी विनंती केली असता यादव कुटुंबीयांनी त्याला तात्काळ होकार दिल्यानंतर सदाशिव यादव यांचे नेत्रदान झाले. दरम्यान, एका रुग्णाला नवीन आयुष्य पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे यादव कुटुंबियांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, सदाशिव यशवंत यादव, वय ७५, रा. औंध, ता. खटाव हे औंध येथे शेती व्यवसाय करीत असे. सातत्याने कष्टाचे कामे केल्यामुळे आणि समतोल आहार घेतल्यामुळे ते फारसे आजारी पडत नसे. मात्र वय वाढेल तशा प्रकृतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. साधारण चार ते पाच दिवसापूर्वी प्रकृतीचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु होते. त्या रुग्णाचे दोन्ही डोळे निकामी झाल्यामुळे त्याला निकोप डोळ्यांची आवश्यकता होती. याबाबतची माहिती वैद्यकीय पथकाने यादव यांच्या कुटुंबियांना देऊन सदाशिव यादव यांचे मरणोत्तर नेत्रदान करावे, अशी विनंती केली. याबाबत यादव कुटुंबीयांनी क्षणाचा विलंब न लावता त्याला तात्काळ होकार देत सामाजिक बांधिलकी जोपासली.कुटुंबीयांची परवानगी आणि कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर निधन झालेल्या सदाशिव यशवंत यादव यांचे दोन्ही डोळे नेत्रदान रुपये काढण्यात आले असून त्या डोळ्यांचे प्रत्यारोपण आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे यादव कुटुंबीयांच्या निर्णयामुळे संबंधित रुग्णाला एक नवीन आयुष्य पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मरणोत्तर नेत्रदान हे सामाजिक कर्तव्य : डॉ. सुभाष चव्हाण
समाजामध्ये आज अंशतः आणि पूर्णतः अनेक अंध व्यक्ती वावरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आज अनेक अंध युवक, युवती, व्यक्ती आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आयुष्यात सफल झालेल्या पाहायला मिळतात. या व्यक्ती स्वाभिमानाने जगण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. आज आपण सर्वच डोळस आहोत. आपण समाजाचे काही देणे लागतो, याचा विसर न पडता मरणोत्तर नेत्रदान करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकी आहे. औंध येथील यादव कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.