पारंपरिक वाद्यांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीत जिल्ह्यासह सातारा शहरात रविवारी दुर्गामातेची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सलग नऊ दिवस चालणाऱ्या या भक्तीच्या मेळ्याने आबालवृद्धांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सातारा : पारंपरिक वाद्यांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीत जिल्ह्यासह सातारा शहरात रविवारी दुर्गामातेची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सलग नऊ दिवस चालणाऱ्या या भक्तीच्या मेळ्याने आबालवृद्धांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केल्यानंतर भक्तांना दुर्गोत्सवाची आतुरता लागली होती. ही आतुरता रविवारी संपली असून, घरोघरी घटस्थापनेने दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सातारा शहरातील सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या. रविवारी सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका सुरू झाल्या. या मिरवणुका पाहण्यासाठी राजपथावर भाविकांची गर्दी लोटली होती. फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अन् दुर्गादेवीच्या जयघोषणाने वातावरणात चैतन्य पसरले होते.
मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा शहरातील देवी चौकातील कासार देवी मंदिर, प्रतापगंज पेठेतील महाकाली मंदिर, मंगळवार तळे परिसरातील शिवकालीन ऐतिहासिक श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या मंदिरांमध्ये पुढील नऊ दिवस जागर, महाआरती, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली
शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून, अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. त्यामुळे शहरात फराळाचे साहित्य व फळांंची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, नागरिकांनी फळे, पालेभाज्या, पूजेचे साहित्य आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. याशिवाय मातीची मडकी, वेताची परडी, वस्त्र, माती, वाणाचे साहित्य, चुनरी, फुले अशा साहित्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याने व्यापारी व विक्रेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.


