maharashtra

जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छता यंत्रणेवर ताण

कंत्राटी कर्मचाऱ्यांना ब्रेक दिल्याने कामाचा खोळंबा

Stress on the sanitation system of the district hospital
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयाच्या 19 विभागातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून पुरेशा स्वच्छते अभावी रुग्णांची ससेहोलपट वाढली आहे. कारण रुग्णालयाला सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक ब्रेक देण्यात आल्याने स्वच्छता यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयाच्या 19 विभागातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून पुरेशा स्वच्छते अभावी रुग्णांची ससेहोलपट वाढली आहे. कारण रुग्णालयाला सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक ब्रेक देण्यात आल्याने स्वच्छता यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय हे उपचारासाठी हक्काचे केंद्र आहे. या रुग्णालयात 19 विभाग आहेत आणि सफाई कर्मचारी जवळपास 130 च्या घरात आहेत. यातील काही कर्मचारी वगळता इतर सर्व कायमस्वरूपी अस्थापना वर आहेत. असे असताना अद्यापही बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती कक्ष तसेच कोरोना केअर सेंटर च्या दर्शनी भागाची स्वच्छता याकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. विशेषत: प्रसूती कक्षालगतच्या स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता आवश्यक असताना ती व्यवस्थित होत नसल्याची तक्रार आहे. याशिवाय जनरल वॉर्डालगतची जी चार शौचालये आहेत, त्याचे दोन दरवाजे तुटले आहेत. तेथे सफाई कर्मचारी उपलब्ध होत नाहीत, असे वारंवार सांगितले जाते. याशिवाय rt-pcr लॅब आणि वुमन्स हॉस्पिटलच्या प्रस्तावित इमारतीची सुद्धा पुरेशा स्वच्छते अभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे.
असे असताना रुग्णालय प्रशासनाने मंगळवारी जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या बत्तीस कर्मचाऱ्यांना अचानक ब्रेक दिला. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असता ठेकेदार याबरोबरच हा करार संपुष्टात आल्याने हे कर्मचारी आस्थापनेवरून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले असे असले तरी प्रत्यक्षात सव्वाशे कर्मचाऱ्यांची कामावर गरज आहे. त्यातील 32 कर्मचारी कमी झाल्यास 80 कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष सफाईचा ताण पडत असून रुग्णालयाला काही वॉर्डांसाठी स्वतंत्र यंत्रणा द्यावी लागणार आहे.
या संदर्भात बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण म्हणाले, ही कारवाई अजिबात नाही. ठेकेदाराच्या कराराची मुदत वाढवून संबंधित कर्मचारी कसे सामावून घेता येतील यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कोठेही स्वच्छता यंत्रणेवर ताण पडणार नाही, अशी रचना करण्यात येणार आहे. मात्र या स्पष्टीकरणाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही. संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा चव्हाण यांनीसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाने याबाबत तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.