राज्य सरकारच्या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मंगळवार, दि.१४ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जूनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करावी, कंत्राटी कामगारांना कायम करावे, या मागण्यासह १८ मागण्यांसाठी करण्यात येत आहे.
सातारा : राज्य सरकारच्या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मंगळवार, दि.१४ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जूनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करावी, कंत्राटी कामगारांना कायम करावे, या मागण्यासह १८ मागण्यांसाठी करण्यात येत आहे. हा संप एकीने यशस्वी करुयात, असा निर्धार केल्याची माहिती जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनमधील हॉलच्या बैठकीनंतर राज्य संघटनेचे नेते गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संघटनेचे काका पाटील, सुलेखा चव्हाण, राजू कदम, नेताजी दिसले आदी उपस्थित होते. गणेश देशमुख म्हणाले, आम्हीही सर्वसामान्य घरातील आहोत. आमचा हा संप न्याय हक्कासाठी आहे. कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देवून त्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे तात्काळ भरा, चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तात्काळ हटवा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विहित वय मर्यादेत सुट द्या. सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या तत्वत: मंजूर करा. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवातंर्गत प्रश्न तत्काळ सोडवा आदी १८ मागण्यांसाठी हा संप करत आहोत, असे सांगितले.
मंगळवार, दि. १४ रोजी साताऱ्यातील प्रत्येक कार्यालयातून सकाळी ११ वाजता मोर्चाने सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्र येतील. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. दरम्यान, आमचे काही कर्मचारी हे आरोग्य विभागात कार्यरत आहेत. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. लोकांच्या जिवाशी खेळण्याचा आमच्या कर्मचाऱ्यांकडून कधीही प्रकार होणार नाही. अत्यावश्यक सेवेतील आमचे कर्मचारी काम करणार आहेत. त्यांचा या संपात काम करुन सहभाग असणार आहे, अशी माहिती सुलेखा चव्हाण यांनी दिली.


