maharashtra

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडी कडून अटक

फोन टॅपिंग प्रकरण भोवले; दोन आठवड्यांच्या चौकशीनंतर झाली कारवाई

Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey arrested by ED
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.
संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरु केली होती. २००६ मध्ये पांडे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले, त्यावेळी त्यांनी आपली आई आणि मुलाला कंपनीचे संचालक केले. पांडेंच्या कंपनीला एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले. चित्रा रामकृष्ण यांच्या काळात झालेला एनएसईतील गैरव्यवहार लेखापरीक्षणात का उघड झाला नाही, याची चौकशी करण्यात आली.
कोण आहेत संजय पांडे?
संजय पांडे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांच्या बदलीनंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पांडेंचा कार्यकाळ ३० जून २०२२ रोजी समाप्त झाला.
यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदावर असताना परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागली, त्यावेळी संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.