मलकापूरात युवकावर हल्ला केल्याप्रकरणी चौघांना अटक
पाच दिवस पोलीस कोठडी : हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त
मलकापूर, ता. कराड येथे बुधवारी १५ रोजी भरदिवसा विश्वास हणमंत येडगे रा. मलकापूर याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली होती. लहान मुलांची भांडणे सोडविण्यासाठी गेल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये येडगे हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासातच चौघांना पाठलाग करून अटक केली आहे.
कराड : मलकापूर, ता. कराड येथे बुधवारी १५ रोजी भरदिवसा विश्वास हणमंत येडगे रा. मलकापूर याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली होती. लहान मुलांची भांडणे सोडविण्यासाठी गेल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये येडगे हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासातच चौघांना पाठलाग करून अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुस्तकीन हनीफ पटेल (वय 24) रा. अष्टविनायक कॉलनी, गौरव सुरेश बनसोडे (वय 21) रा. संभाजी चौक, शुभम शंकर काकडे (वय 23) रा. शिवाजी चौक व विक्रम बरकडे चौघेही रा. मलकापूर असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी 15 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास मलकापूर फाटा ता. कराड येथे संशयितांनी आपापसात संगणमत करून विश्वास येडगे याच्यावर भरदिवसा धारधार शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर सायंकाळपर्यंत पोलिसांनी संशयित चौघांनाही सापळा रचून शेणोली ता. कराड येथे तालुक्यातून बाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेऊन रात्री उशीरा अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर व पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील करत आहेत.
पोलिसांनी संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 पर्यंत (५ दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयितांनी हल्ल्यात वापरलेले धारदार शस्त्र हल्लेखोरणी ऊसात टाकले होते. ते शस्त्रही पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी जप्त केले आहे.
मलकापूर (अहिल्यानगर) येथील युवकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मलकापूर शहरातील समस्त धनगर समाजाने गुरुवारी १६ रोजी सकाळी कराड शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तसेच मलकापूर परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, याबाबतचे निवेदनही धनगर समाजाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यांनतर जमाव शांत झाला.


