उत्पादन शुल्क च्या भरारी पथकाची जुळेवाडी येथे कारवाई
बनावट दारू तयार करणार्या टोळीचा पर्दाफाश; एक लाख 94 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त
जुळेवाडी, ता. कराड येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग साताराच्या भरारी पथकाने धाड मारून बनावट दारू तयार करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट देशी दारूचा साठा व एक चारचाकी वाहनाचा 1 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा : जुळेवाडी, ता. कराड येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग साताराच्या भरारी पथकाने धाड मारून बनावट दारू तयार करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट देशी दारूचा साठा व एक चारचाकी वाहनाचा 1 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोहित रमेश सोनवणे वय 26 रा. कुंडल ता. पलूस जि. सांगली, फैयाज मुसा मुल्ला वय 53 राहणार मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा, शेखर गुणवंत बनसोडे वय 50 राहणार रेठरे तालुका कराड जिल्हा सातारा या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
भरारी पथकाचे विक्री निरीक्षक माधव चव्हाण आणि त्यांच्या पथकाला जुळेवाडी व मलकापूर येथे बनावट दारू विक्रीचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. चव्हाण यांच्यासह संजय साळवे, निरीक्षक किशोर नडे, शरद नरळे, प्रशांत नागरगोजे, नितीन जाधव, महेश मोहिते, सागर आवळे, मनीषा माने, भीमराव माळी, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, राजेंद्र वडे, अरुण जाधव, किरण जंगम, सचिन जाधव, राणी काळोखे या पथकाने रविवारी जुळेवाडी तालुका कराड गावाच्या हद्दीत सापळा रचून बनावट दारूची वाहतूक करताना रोहित सोनवणे याला अटक केली. त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याची कसून चौकशी केली असता तो माल जुळेवाडी तालुका कराड येथील देशी दारूच्या दुकानाच्या पाठीमागे नेला जाणार होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार तेथे जात फैयाज मुसा मुल्ला व शेखर बनसोडे या दोघांना अटक करून त्यांच्याकडील एक लाख 40 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रेठरे तालुका कराड येथे कॅनल चौथीच्या परिसरात मुलांची नावाच्या शिवारात ऐय्याज अबू मुल्ला उर्फ बारक्या शहाबुद्दीन मुल्ला वय 34 रा. रेठरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दारूचा साठा, बनावट दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य, कॅप्सूल इन मशीन, बनावट लेबल, बनावट बुच असे साहित्य जप्त करण्यात आले, चार ठिकाणी मारलेल्या या छाप्यामध्ये एकूण 19 लाख 12 हजार दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या इसमांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या 65 अ ब क ड या कलमाप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या सर्व आरोपींना कराड न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. जुळेवाडी तालुका कराड येथील फैज मुल्ला यांनी त्यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानात बनावट दारूचा साठा विक्री करण्यासाठी जवळ बाळगला म्हणून त्याच्यावर सुद्धा स्वतंत्र गुन्ह्याण्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये बनावट दारू अथवा दारू निर्मिती, विक्री, वाहतूक अशी कोणतीही गोष्ट निदर्शनास आली असता राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयास माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क सातारा अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे.


