maharashtra

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास जिल्हा अपघातमुक्त होणार

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

राज्यातील अपघातांचा आढावा घेतला असता सातारा जिह्यात गत महिन्यात तब्बल 90 अपघात झाले असून त्यात किमान 47 जण मृत्युमुखी पडले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर यंत्रणांच्या समन्वयातून 42 ब्लॅकस्पॉट वरुन 8 सध्या शिल्लक आहेत.

सातारा : राज्यातील अपघातांचा आढावा घेतला असता सातारा जिह्यात गत महिन्यात तब्बल 90 अपघात झाले असून त्यात किमान 47 जण मृत्युमुखी पडले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर यंत्रणांच्या समन्वयातून 42 ब्लॅकस्पॉट वरुन 8 सध्या शिल्लक आहेत. रस्ता सुरक्षा जनजागृती, अतिवेगवान वाहनांवर कारवाई, अपघाताचे विश्लेषण करून अंमलबजावणी करण्यासाठी तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनधारकने  वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे.वेग मर्यादेचे पालन करा, दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापरा, नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला, असे आवाहन करुन सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप करताना दिली.  
परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत सातारा जिह्यातील अपघात आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. राज्यात गतवर्षाच्या तुलनेत अधिक प्रमाणात रस्ते अपघात वाढल्याने रस्ता सुरक्षा आणि  उपाययोजना याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने वरिष्ठ कार्यालयाच्या बैठकीत आढावा घेतला. यात अपघाताच्या प्रमाणात घट करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकायांना सुचना दिल्या गेल्या आहेत. यावर सातारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण आणि कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.जिह्यातील अपघात प्रवण क्षेत्र असलेले पारगाव-खंडाळा, वेळे ,म्हसवे (डि मार्ट), शेंद्रे, कोर्टी, तारळी नदी पुल, उंब्रज, कोल्हापूर नाका, मलकापूर फाटा, मालखेड या 8 ठिकाण असलेले ब्लॅक स्पॉट कमी करणे, अतिवेगाने होणारे अपघात टाळणे, जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. तर प्रत्येक तालुका निहाय मोटार वाहन निरीक्षक नियुक्त केले असून संपूर्ण रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याबाबत योग्य उपाययोजनांसाठी संबंधित विभागास कळविण्यात येणार असल्याचे विनोद चव्हाण यांनी सांगितले.तर कराड कार्यालयाच्या हद्दीतील सर्व ब्लॅक स्पॉट संपणार असल्याचे विनोद सगरे यांनी सांगितले.  
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 वर्षांत जिह्यात विविध अपघात झाले त्यात 483 प्राणांतिक, गंभीर इजा 355, किरकोळ इजा 47 , कोणतीही इजा नसलेले 59 असे 944 अपघातांची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या जानेवारी 22 महिन्यात 81 अपघात होऊन त्यात 33अपघात हे प्राणांतिक तर 37 जण मृत्युमुखी पडले होते.यावर्षी जानेवारी 23 महिन्यात 90 अपघातापैकी 43 प्राणांतिक तर 47 मृत्यूमुखी पडले आहेत. यात दिवसावेळी जास्त अपघात प्रमाण असून त्यात दुचाकी वाहनांचे अपघात सर्वाधिक आहेत.  
सातारा कार्यालयाकडून वर्षभरात 17 हजार 641 तर कराड कार्यालयाकडून 4 हजार 973 वाहनांवर कारवाई करुन 816 कोटी 44 लाख रक्कम वसुल केली आहे. महामार्गावरून अतिवेगाने जाणाया वाहनांवर स्पिडगनच्या सातारा कार्यालयाने 8 हजार 410 तर कराड कार्यालयाने 2 हजार 510 वाहनांवर कारवाई केल्याची माहिती यावेळी दिली गेली. खाजगी प्रवासी वाहतूक करणाया वाहनांवर कारवाई करण्यात सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर असून रात्र दिवस कार्यरत असलेल्या विशेष वायु पथक निर्मिती करत कारवाई केल्या जात आहेत.    
शहरी पेक्षा तिप्पट अपघाताचे प्रमाण हे ग्रामीण भागात आहे.यासाठी दोन्ही कार्यालयाकडून रस्ता सुरक्षेबाबत सामाजिक जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबविले जात असून अपघातांचे विश्लेषण करून तत्काळ उपाययोजना केल्या जातात.जिल्हा अपघात मुक्त करण्यासाठी संसदीय रस्ता सुरक्षा समिती आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो. तर सातारा आणि कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी सर्वोत्तम योगदान देत असल्याचे विनोद चव्हाण आणि विनोद सगरे यांनी यावेळी सांगितले.