maharashtra

नायगाव ते मांढरदेव रस्त्यासाठी पाठपुरावा करणार ...


Will follow up for Naigaon to Mandhardeo road.
पालकमंत्री शंभूराज देसाई , पळशी येथे जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

खंडाळा : खंडाळा सारख्या दुष्काळी तालुक्यात तत्कालिन परिस्थितीत शेती सिंचनासाठी छोटया धरणांची संकल्पना दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे यांनी राबविली . शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे . सर्वसामान्य माणसांच्या जीवनाविषयी प्रचंड सहानुभूती असणारे ते लोकनेते होते . या भागातील नायगाव ते मांढरदेव रस्त्याला मंजूरी देण्यात आली आहे, ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करु असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
      पळशी ता . खंडाळा येथे माजी सभापती लक्ष्मणराव भरगुडे पाटील स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जि .प. अध्यक्ष  उदय कबुले, बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील , कारखान्याचे अध्यक्ष व्ही.जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे , मनोज पवार, अजय भोसले, यांसह प्रमुख उपस्थित होते .
       मकरंद पाटील म्हणाले, स्वर्गीय भाऊंच्या स्मृती सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून पळशीकरांनी जपल्या आहेत. त्यांचे सुपूत्र समाजकार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. राजकीय जीवनात नितीन बापूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्यामध्ये लढाऊ वृत्ती आहे. सामान्य माणसांची काळजी घेणे हा त्यांचा स्थायीभाव आहे त्यामुळे लोकांची साथ हे त्यांचे शक्तीस्थळ आहे. पुण्यतिथीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा यज्ञ अखंडपणे सुरु ठेवला आहे हे कौतुकास्पद आहे.
      यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना स्व . लक्ष्मणराव भरगुडे पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने प्रसिध्द कथाकथनकार रविंद्र कोकरे यांचे व्याख्यान झाले. यावेळी सरपंच हेमा गायकवाड, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष अशोकराव भरगुडे , सिध्देश्वर राऊत यांसह ग्रामस्थ उपस्थित होते .