ठोसेघर येथे भेकर व चौसिंगा या वन्य प्राण्यांची शिकार
रायफलमॅन युवराज निमन याच्यासह दोन जणांना अटक
ठोसेघर, ता. सातारा परिसरात भेकर आणि चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ठोसेघर येथील आसाम रायफल या मिलिटरी बटालियनमधील रायफल मॅन युवराज निमन, नारायण सिताराम बेडेकर आणि विठ्ठल किसन बेडेकर या तिघांना सातारा तालुका वन विभागाचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सातारा : ठोसेघर, ता. सातारा परिसरात भेकर आणि चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ठोसेघर येथील आसाम रायफल या मिलिटरी बटालियनमधील रायफल मॅन युवराज निमन, नारायण सिताराम बेडेकर आणि विठ्ठल किसन बेडेकर या तिघांना सातारा तालुका वन विभागाचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, युवराज निमन याच्या सातारा येथील माची पेठ येथे राहत्या श्रीवास्तू अपार्टमेंटमध्ये असलेल्या ए - ४ या अपार्टमेंटमध्ये वन विभागाने छापा टाकला असता त्या ठिकाणी भेकर व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राण्यांचे मुंडके व ताजे मटण आणि पायाचे खुर सापडल्यामुळे ठोसेघर परिसरात फार मोठ्या प्रमाणावर शिकारीचे लोण वाढले आहे.
याबाबत वनविभागाच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या माहितीच्या अधिकारे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सातारा तालुक्याचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, सचिन डोंबाळे आदींनी सातारा येथील माजी पेठेत असलेल्या श्री वास्तु अपार्टमेंटमधील ए- ४ सदनिकेमध्ये राहत असलेल्या मुळच्या ठोसेघर, ता. सातारा येथील आसाम रायफल या मिलिटरी बटालियनमधील रायफल मॅन युवराज निमन याच्या राहत्या घरावर छापा टाकला असता वन विभागाच्या पथकाला राहत्या घरामध्ये भेकर व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राण्यांचे मुंडके व भेकराचे ताजे मटण, पायाचे खुर सापडले. याबाबत वन विभागाच्या पथकाने युवराज निमणकडे अधिक चौकशी केली असता त्याने संबंधित वन्य प्राण्यांची शिकार ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर व स्वतः अशी तिघांनी केल्याची कबुली दिली.
नारायण बेडेकर यांच्याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने आज सोमवारी सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या दरम्यान भेकर या वन्य प्राण्याची शिकार बंदुकीच्या साह्याने करण्यात आली. त्यानंतर ठार मारलेल्या भेकराला चेटकाच्या ओढ्यात सोडण्यात आले. त्यानंतर भेकराच्या मटणाचे वाटे करण्यात आले. त्यापैकी आज सकाळी एका भेकराचे मुंडके व थोडे मटण युवराज निमन याला दिले. त्यानंतर भेकराचे कातडे सोलून ते संबंधितांनी ओढ्यात लपविले. उरलेले मटण काही प्रमाणात विठ्ठल बेडेकर याला दिले, तर राहिलेले मटण नारायण बेडेकर हा स्वतःच्या घरी घेऊन गेला. नारायण बेडेकर यांनी सर्व मटण स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून ती पिशवी घरामागील खोलीत शेणीच्या खाली लपवून ठेवली. ते मटण तो सातारा मध्ये कोण्या बड्या हस्तीला देणार होता. ते मटण आज रात्रीच घेऊन जाणार असल्याची कबुली नारायण बेडेकर यांनी वनविभागाच्या पथकाला दिली.
या संपूर्ण कारवाईत वन विभागाच्या पथकाने दोन बंदुक, एक एअर गन, एक सिंगल बोअर बंदुक, जिवंत काडतुस, भेकर सोललेल्याचा चाकु, कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले मटण तसेच कातडे हे वन विभागाने पंचांसमोर जप्त करून आपल्या ताब्यात घेतले. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल केला असून यापूर्वीही या तिघांनी अशाप्रकारचे वेगवेगळे गुन्हे केल्याचे पुरावे वन विभागाला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती डॉ. निवृत्ती चव्हाण यांना प्राप्त झाली आहे.
आरोपीना अटक करण्यात आली असून वन गुन्हा नोंद झाला आहे. पुढील चौकशी सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले हे करीत आहेत.
शिकारींना चाप बसण्यास मदत
गेल्या काही वर्षातील ठोसेघर येथील ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. यापूर्वीही ठोसेघर येथे फार मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते, यासारखी वृत्ते दैनिक ऐक्यने प्रकाशित केली होती. वन विभागाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे वन्य प्राण्यांचा फार मोठ्या प्रमाणात बळी गेला होता. ठोसेघर येथील बसस्टैंडवर फास्यामध्ये ससा आढळल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. ही बाब वन विभागाला सांगितल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यांनी क्लीनचिट दिल्यामुळे संबंधित शिकारी मोकाट सुटले होते. ही बाब या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावीशी वाटते.
रात्रगस्त वाढवण्याची गरज
ठोसेघर व परिसरात रात्रीच्या वेळी जंगल भटकंती ही संकल्पना राबवण्यापेक्षा वन विभागाने संयुक्तपणे रात्रगस्त घालण्याची गरज आहे. प्रत्यक्षात परळी बीट येथे काम करणारे वन विभागाचे दोन्ही कर्मचारी सातारा येथे वास्तव्य करतात. एखादी दुर्घटना घडल्यास म्हणजेच बिबट्याने वन्य प्राण्यांवर हल्ला केल्यानंतर एखाद्या वृत्तपत्रात बातमी छापून आल्यानंतर तो पत्रकार आमच्या डोक्यात जातो, असे सांगत लोकशाहीच्या चौथ्या खांबालाच आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. अशा कर्मचाऱ्यांना महादेव मोहिते यांनी कामाला लावून त्यांचे प्रत्यक्ष कर्तव्य काय आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून द्यावे एवढीच माध्यमांकडून अपेक्षा आहे.


