वाघजाई वाडी येथे लम्पीग्रस्त गाईने दहशत निर्माण केली असून या गाईवर योग्य उपचार करण्याची मागणी वाघजाईवाडी येथील शेतकरी करीत आहेत.
चाफळ : वाघजाई वाडी येथे लम्पीग्रस्त गाईने दहशत निर्माण केली असून या गाईवर योग्य उपचार करण्याची मागणी वाघजाईवाडी येथील शेतकरी करीत आहेत.
लम्पी बाधित झालेल्या जनावरांचे करायचे काय, या भीतीने वाघजाई वाडी मध्ये एका शेतकर्याने पाच ते सहा दिवसांपूर्वी त्याची गाय सोडून दिली आहे. लम्पीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांचे पशुधन धोक्यात आले असतानाच लम्पीग्रस्त गाई मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गाईचा मालक कोण? तिला कोणी सोडून दिले ? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत. त्यातच ही गाय चरायला सोडलेल्या जनावरांबरोबर चरायला जाते. त्यामुळे तिच्या संसर्गामुळे इतर जनावरांना लम्पीची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी या गाईला हाकलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ही गाई पुन्हा याच गावात येत असल्याने ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाने या गाईस ताब्यात घेऊन तिच्यावर योग्य ते उपचार करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तातडीच्या ठिकाणी पशु विभागाचे फिरते पथक कार्यरत असते असे सांगितले जाते. परंतु चाफळ विभागात हे पथक फिरकलेच नाही. मात्र वाघजाई वाडी मधली वाडी परिसरात फिरणार्या या गाईचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी मधली वाडी मधील शेतकरी संतोष सुर्ले यांनी केली आहे.


