maharashtra

राष्ट्रवादीच्या खेळीमध्ये उध्दव ठाकरे फसले

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची साताऱ्यात खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय खेळीमध्ये उध्दव ठाकरे फसल्याने त्यांच्यावर सत्ता गमाविण्याची वेळ आली. ठाकरे आता सर्व त्यांच्या प्रमाणेच विचार करत असल्याची जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सातारा : चुकीच्या राजकीय संघटनाच्या संपर्कामुळे जनतेकडे लक्ष न देणाऱ्या महाविकास आघाडीचा कार्यभार अडीच वर्षात आटोपला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय खेळीमध्ये उध्दव ठाकरे फसल्याने त्यांच्यावर सत्ता गमाविण्याची वेळ आली. ठाकरे आता सर्व त्यांच्या प्रमाणेच विचार करत असल्याची जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा जास्त आमदार निवडूण आणणार असल्याची ठाम ग्वाही दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सातारा दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद बहुउद्देशीय सभागृहात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मदन भोसले, विक्रम पावसकर, अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, भरत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
बावनकुळे म्हणाले,‘‘भाजपच्या स्थापनेवेळी देशभरात इंदिरा गांधी व शरद पवार यांच्या मागे संपूर्ण देश उभा होता. त्या काळात भाजपचा झेंडा कुठेतरी दिसत होता. मात्र, भाजपला तळागाळात वाढविण्यासाठी अनेकांनी कष्ट सोसल्याने आता जगात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला भाजप पक्ष बनला आहे. सध्याचा भारतीय जनता पक्षाचा सर्वोच्च काळ आहे. पुढील काळात भारतीय संस्कृती, हिंदुत्त्व जगात सर्वोत्तम पदावर नेण्यासाठी व देश सर्वशक्तिमान करण्यासाठी भाजपच्या मागे उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना ही यात्रा नेत्यांनी हायजॅक केली असून सर्वसामान्य कार्यकर्ता यात्रेत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार गोरे म्हणाले,‘‘पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थासह विधानसभा व लोकसभा निवडणुकीत एक नंबरचा पक्ष बनविणार आहे. निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र येऊन लढली तरी सत्तेत भाजप येणार आहे. तसेच नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आम्ही सर्वजण सैनिक म्हणून काम करुन तळागाळात पक्ष रुजविणार आहे.’’