मध्यरात्री सुनसान रस्त्यावर मुलीचे जीवेघेणे धाडस
फलटण -पुसेगाव रस्त्यावरील मेळ न लागणारी घटना
फलटण -पुसेगाव रस्त्यावर एक 15 ते 16 वर्षीय मुलगी मध्यरात्री 3 ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास पाठीवर सॅक लावून एकटीच निघाली होती. बारामतीचे पत्रकार मच्छिंद्र टिंगरे यांनी मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग घेत तिची विचारपूस करुन तिला एका वस्तीवरील घरी थांबवले. मात्र, ती कोण होती व तिचे पुढे काय झाले, अशा अनेक प्रश्नांची मालिका शनिवारी दुपारी समोर आली पण अल्पवयीन मुलीचे हे धाडस जीवेघेणेही ठरु शकले असते.
सातारा : गेल्या काही दिवसात जिल्ह्यात एका मुलीवर बलात्कार करुन खून तर एकाने मेव्हण्याला अडचणीत आणण्यासाठी युवतीचा केलेला खून अशा घटना ताज्या असतानाच फलटण -पुसेगाव रस्त्यावर एक 15 ते 16 वर्षीय मुलगी मध्यरात्री 3 ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास पाठीवर सॅक लावून एकटीच निघाली होती. बारामतीचे पत्रकार मच्छिंद्र टिंगरे यांनी मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग घेत तिची विचारपूस करुन तिला एका वस्तीवरील घरी थांबवले. मात्र, ती कोण होती व तिचे पुढे काय झाले, अशा अनेक प्रश्नांची मालिका शनिवारी दुपारी समोर आली पण अल्पवयीन मुलीचे हे धाडस जीवेघेणेही ठरु शकले असते.
या घटनाक्रमाची हकीकत पत्रकार मच्छिंद्र टिंगरे यांनी सोशल मिडियावर त्यांनी काढलेल्या व्हिडिओसह शेअर केली. कारण एकतर मध्यरात्रीची वेळ आणि एक अल्पवयीन मुलगी सुनसान रस्त्यावर पाठीवर सॅक अडकवून घाईने चालत निघाली होती. टिंगरे त्यांच्या कामानिमित्त बारामतीहून पुसेगावला निघाले होते. त्यावेळी फलटण ते पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर गावाजवळून ते जात असताना एक मुलगी एकटीच निघाली असल्याचे दिसले. तिने लिफ्ट मागण्यासाठी हातही केला. पण कोणीतरी ऊसतोड वाल्यांचे असेल म्हणून दुर्लक्ष करुन ते दोन ते अडीच कि. मी. पुढेही निघून गेले.
मात्र, काहीतरी चुकल्यासारखे वाटल्याने टिंगरे पुन्हा कार वळवून मागे आले त्यावेळी येताना त्यांनी मोबाईलचे व्हिडिओ शुटींग सुरु ठेवले. पुन्हा आल्यावर त्यांनी मुलीला हाक मारुन संवाद साधला. कोठे निघाली आहेस, एवढ्या रात्री कशी काय चालत निघाली आहेस, तुझ्या घरच्यांचा क्रमांक आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी तिने एक क्रमांक टिंगरे यांना दिला. टिंगरे यांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला असता समोरुन बोलणार्या युवतीने ती युवती तिची बहीण असून ती व्हॅनने प्रवास करुन आली असून ती तिच्याकडे येत असल्याचे सांगितले.
मात्र, ती समोरुन बोलणारी युवती संबंधित अनोळखी मुलगी ही तिच्याकडे नगरला येत असल्याचे सांगत होती. फलटण -पुसेगाव रस्ता, पैठण, नगर हा काही मेळ जुळत नव्हता. मग टिंगरे यांनी जवळच असलेल्या घराकडे मुलीला येण्यास सांगितले. तिथे वस्तीवर असलेल्या एका घरातील जगताप नावाची व्यक्ती आली. त्या व्यक्तीला ही मुलगी एकटीच निघाली असून तिला सकाळपर्यंत तुमच्याकडे थांबू द्या. सकाळी ती निघून जाईल असे सांगून ते कारमधून पुसेगावच्या दिशेने निघाले. जाताना त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याला फोन केला त्यांनी फलटण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यास सांगितले. टिंगरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला फोन करुन एक मुलगी अशा प्रकारे मध्यरात्री एकटीच चालली असल्याचा घटनाक्रम सांगून तिला ज्या वस्तीवरील घरापाशी थांबण्यास सांगितले असल्याची माहिती देवून या प्रकाराची माहिती घेण्यास सांगितले.
टिंगरे पुसेगाव, कोरेगावला जावून त्यांचे काम उरकून परत जाताना त्यांनी वाठार निंबाळकरजवळील वस्तीवर जिथे मुलीला सकाळपर्यंत थांबण्यास सांगितले होते तिचे काय झाले याची विचारणा केली तर पाणी पिले की ती मुलगी लगेच तेथून निघून गेल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. त्यावर टिंगरे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जावून रात्रीच्या प्रकाराबाबत पोलिसांनी काही माहिती घेतली का, कारवाई केली का विचारण्यास गेले. मात्र, पोलिसांकडून काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी माहिती घेतली का, पोलीस गाडी मुलीला शोधण्यास गेली का याची काहीच मिळाली नाही. मग त्या मुलीचे नेमके झाले, काही बरेवाईट तिच्याबाबतीत घडू नये, अशी टिंगरे यांची भावना होती.
पत्रकार टिंगरे यांनी मग रात्रीच्या सर्व घटना क्रमाची माहिती देणारा व्हिडिओ बनवला व तो सोशल मिडियावर टाकून या घटनेचे किती गांभीर्य आहे याचे विवेचन केले. त्यांनी रात्रीच्या वेळी नेमके काय केले त्याचे व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्या या कृतीचे अभिनंदन केले. मात्र, त्या मुलीचे पुढे नेमके काय झाले हा प्रश्न सर्वांनाच सतावत असताना त्याच पोस्टवर एकाने कॉमेंट करत संबंधित मुलगी एका गावातील असल्याचे सांगत तिच्या कुटुंबियाचा क्रमांक शेअर केला.
पत्रकार टिंगरे यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित मुलीच्या आईने तो फोन घेतला होता. तिने त्यांची मुलगी बेपत्ता झाली असल्याचे सांगून याबाबत त्यांनी फलटण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. त्यामुळे निदान ती मुलगी कोणत्या गावची आहे हे तरी कळाले. पण आता पोलिसांना ती मिळून आली की नाही किंवा ती आता नेमकी कोठे आहे याचा शोध घेण्याचे काम तिच्या नातेवाईक व पोलिसांना करावेच लागणार असले तरी अशा प्रकारे मुलींनी मध्यरात्री एकटीने फिरणे किती धोक्याचे असू शकते याची जाणीव टिंगरे यांच्या कृतीने सर्वांसमोर आली.


