विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणारा सराईत गुन्हेगार गणेश कारंडे याला उप विभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.
सातारा : विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणारा सराईत गुन्हेगार गणेश कारंडे याला उप विभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार गणेश गुलाब कारंडे रा. अतीत, ता. जि. सातारा याच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, जुगार, दंगा, मारामारी, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांनी कारंडे यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केली होती.
कारंडे हा सराईत होता. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यास अटक आणि कायदेशीर कारवाई करूनही तो जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा पुन्हा गुन्हे करीत होता. त्याला कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वसामान्य जनतेतून मागणी होत होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले सातारा उपविभाग सातारा यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी कारंडे याला एक वर्षाकरिता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.
नोव्हेंबर 2022 पासून 12 उपद्रवी टोळ्यांमधील 35 जणांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील आठ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामे हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे, पोलीस हवालदार अमित सपकाळ, किरण निकम, दादा स्वामी, प्रशांत चव्हाण, बोरगाव पोलीस ठाणे यांनी योग्य पुरावा सादर केला.


