maharashtra

जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील : खा. शरद पवार


Karmaveer Bhaurao Patil University will be established from June 2022 : Sharad Pawar
सर्वसामान्य वर्गास शिक्षण द्यावे तसेच ‘रयतने स्वतःचे विद्यापीठ काढावे’ ही इच्छा अण्णांची होती.आपल्याला राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे येत्या जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.

सातारा : ‘कर्मवीर अण्णांनी जे काम हातामध्ये घेतले त्यासाठी आपले आयुष्य सर्व खर्ची घातले. सर्व सामान्यांच्या मुलांमुलीना प्रोत्साहित करण्यासाठी ज्ञानाचा आधार देणे ही आपली जबाबदारी आहे हे मनात ठेवून उभे आयुष्य ज्ञानधारणेसाठी त्यांनी खर्ची घातले. त्याचा परिणाम म्हणून आज ही संस्था देशातली सर्वात महत्वाची संस्था झाली आहे. सर्वसामान्य वर्गास शिक्षण द्यावे तसेच ‘रयतने स्वतःचे विद्यापीठ काढावे’ ही इच्छा अण्णांची होती.आपल्याला राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे येत्या जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.
रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर समाधी परिसर येथे आयोजित केलेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ना. बाळासाहेब पाटील, खा श्रीनिवास पाटील, ना. विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, उपस्थित होते.
खा. शरद पवार पुढे म्हणाले,, कोरोना काळात रयत शिक्षण संस्थेने ऑनलाइन एज्युकेशनद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली. रयत शिक्षण संस्था विविध औद्योगिक संस्थांशी करार करीत असल्याने विविध कंपन्या आता स्वतः ट्रेनिंग देणार आहेत आणि त्यामुळे संस्थेतील एक लाख विद्यार्थ्यांना आता नोकऱ्या मिळतील. बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्याबद्दल गौरव करीत असताना ते म्हणाले, ‘देशी बी-बियाणे सेंद्रिय शेतीचा आदर्श पोचवण्याचे त्या काम करतात. शिक्षणापासून बाजुला झालेली व्यक्ती आज जीवनमूल्यांचे शिक्षण देत आहे. आज अण्णा असते तर त्यांनी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिली असती’. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री  दिलीप वळसे - पाटील यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार देऊन संस्थेने त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एन.डी.पाटील हे आज आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी  सर्वसामान्यासाठी आयुष्य झोकून देऊन काम केले, भाई गणपतराव देशमुख व शंकरराव कोल्हे यांनी अण्णांचा विचार सर्वत्र पोहचवला असेही ते म्हणाले.
या समारंभात  ज्यांना ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात आला त्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे मनोगतात म्हणाल्या, ‘आज मला येथे पुरस्कार मिळाला अभिमानाची गोष्ट आहे. या सारखे मी अनेक पुरस्कार घेतले ते माझे नसून मातीचे आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले पद्मश्री पुरस्कार घेतला. काही म्हणाले,‘’तुला कसे वाटते ? मला  मातीचे ध्यान आले,. काळ्या आईचे हे पुरस्कार आहेत, बियांचे आहेत. माझी मातीशी नाळ जोडली आहे. हे पुरस्कार शेतकरी बांधवांचे आहेत. हे काम करीत असताना जाणवते, आपण खरोखर आपल्या आईला विसरलो आहोत. जुने ते सोने आणि खणखणीत नाणे आहे.
 दिलीप वळसे -पाटील यांनी इस्माईलसाहेब  मुल्ला जीवनगौरव पुरस्कार दिल्याबद्दल मनोगत व्यक्त करून संस्था व मुल्ला कुटुंबीय यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  दिलेल्या पुरस्कार रकमेत भर टाकून २५ लाख रुपये इतकी देणगी त्यांनी रयत शिक्षण संस्थेला देण्याचे जाहीर केले.  हा पुरस्कार शरद पवार यांना अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  संस्थेचा विविध औद्योगिक  संस्थांशी करार झाल्याने व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपयोजन होत असल्याने संस्थेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मवीर पुण्यतिथी निमित्ताने माजी मंत्री, संस्थेचे उपाध्यक्ष भाई गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांनी तो पुरस्कार स्वीकारला.
शाश्वत शेतीच्या संवर्धनासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांना सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार यांना देण्यात आला .या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप रुपये अडीच लाख, मानपत्र असे आहे. प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले.रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.मानपत्रांचे वाचन संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.संजय नागपुरे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
तत्पूर्वी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 63 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळावर पुष्प अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे यांनीही पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर पुष्प अर्पण करुन  अभिवादन केले.