तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सत्कार समारंभ रद्द करा
बहुजन मुक्ती पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सत्कार समारंभ क्रीडाई सातारा यांनी उद्या दि.१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील द फर्न रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये घेतला असून तो समारंभ तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा : तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सत्कार समारंभ क्रीडाई सातारा यांनी उद्या दि.१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील द फर्न रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये घेतला असून तो समारंभ तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना त्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील सामान्य जनता भेटण्यासाठी येत असे मात्र ते केवळ धनदांडग्या लोकांनाच वेळ देत होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता खूप त्रस्त झाली होती. जिल्ह्यातील अनेक कार्यालयातील भ्रष्टाचाराचा तक्रारी त्यांच्याकडे केलेल्या असताना सुद्धा संबंधितांवर त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. जिल्ह्यातील ॲट्रॉसिटी केसमध्ये लोकांना न्याय भेटत नव्हता. लोकांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या फाईलवर सगळ्यांसाठी खूप दिवस वाट पहावी लागत होती. जिल्ह्यातील कोरोना काळातील परिस्थिती भयानक असताना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील जम्बो कोविड सेंटरमध्ये केवळ पुणे, मुंबईच्या धनदांडग्या लोकांना बेड उपलब्ध करून दिले गेले होते. याबाबत आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी खाजगी बाउन्सर तैनात करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्यावर नाराज आहे. शेखर सिंह यांची बदली झाली असल्यामुळे त्यांचा उद्या सातारा येथे सत्कार व निरोप समारंभ घेण्यात आला असून त्यांना महागड्या वस्तू भेट दिल्या जाऊ शकतात त्यामुळे हा समारंभ रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेडचाही विरोध
तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सत्कार कार्यक्रमास सातारा जिल्हा संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला असून तसे निवेदन त्यांनी नूतन जिल्हाधिकारी यांना दिले आहे, शासनाच्या मार्गदर्शक नियमास अनुसरून बेकायदेशीर ठरू शकणाऱ्या व स्वतःची पोळी भाजण्यासाठी काही विशिष्ट एक मतलबी विचार मनाशी ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सातारा येथे घेतलेला सत्कार समारंभाचा आम्ही तीव्र निषेध करतो. साताऱ्याची माती ही थोर क्रांतीची जननी आहे. या मातीने नेहमीच अपप्रवृत्तीचा विरोध केला आहे. शेखर सिंह यांचा सत्कार समारंभ हा आमच्या सुवर्णमय इतिहासाला भविष्यात वेगळी दिशा देण्याची पहिली पायरी ठरेल म्हणून आम्ही या कार्यक्रमास विरोध करणार आहोत, असा इशारा निवेदनात दिला आहे.


