maharashtra

सातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे वीस मेगावॅटचे उपकेंद्र मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून महावितरण कडून पाच कोटीचा निधी

Approved 20 MW substation at Satara Municipal Power House
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाउस येथील जागेमध्ये वीस मेगावॅट वीज निर्मितीचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातून पाच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कामाची लवकरच सुरुवात होणार असून या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंग मुक्त होण्यास मदत होणार आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाउस येथील जागेमध्ये वीस मेगावॅट वीज निर्मितीचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातून पाच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कामाची लवकरच सुरुवात होणार असून या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंग मुक्त होण्यास मदत होणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहराच्या विकासासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे संकेत इनोवेटिव सातारा या माध्यमातून दिले होते. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. सातारा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोडशेडिंगची समस्या सोडवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नांमुळे महावितरणने सातारा शहर आणि ग्रामीण भागासाठी 20 मेगावॅट वीज निर्मिती करणारे उपकेंद्र मंजुर केले आहे. या प्रकल्पासाठी लागणारा पाच कोटी रुपयांचा निधी उदयनराजे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे उपलब्ध झाला आहे.
सातारा नगरपालिकेच्या मालकीचे यवतेश्वर घाट परिसरात पॉवर हाऊस जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथे वीज निर्मितीचे छोटेखानी युनिट चालवले जात होते. या परिसरात वीस मेगावॅट उपकेंद्रासाठी 15 गुंठे जागा देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या उपकेंद्राच्या निर्मितीमुळे सातारा शहर आणि परिसर येथील पुढील पंचवीस वर्षासाठी विजेची समस्या सुटणार आहे. कण्हेर पाणी पुरवठा योजना व कास पाणीपुरवठा योजना व तत्सम कारणांसाठी जी वीज शेंद्रे एक्सप्रेस फिडर कडून घ्यावी लागते, त्याचा सर्वोत्तम पर्याय या उपकेंद्रामुळे उपलब्ध होणार आहे. विविध पाणी उपसा योजनांना सुद्धा येथून वीज कनेक्शन देणे शक्य होणार आहे. महावितरण व सातारा नगरपालिका यांच्या समन्वयातून हा प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पाचा सातारा शहरासाठी आणि शहर व ग्रामीण भागातील लघु उद्योगांसाठी विशेषत्वाने फायदा होणार आहे. एकीकडे लोडशेडिंगमुळे सातारा औद्योगिक वसाहतीचे नुकसान होत आहे. मात्र वीस मेगावॅटच्या वीज निर्मिती उपकेंद्र मुळे शहरात छोट्या लघुउद्योगांना मोठा वाव मिळणार आहे.
या संदर्भात बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, साताऱ्याचा रचनात्मक विकास हे सातारा विकास आघाडीचे मुख्य धोरण राहिले आहे. कास धरणाच्या उंची प्रकल्पानंतर वीस केवी उपकेंद्र मंजूर करून देणे, हे आमचे उद्दिष्ट राहिले होते. या प्रकल्पात महावितरण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. साताऱ्यात कोणत्याही मूलभूत आणि पायाभूत सुविधांची कमतरता भासणार नाही याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत. त्यादृष्टीने विविध विकास कामांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. या उपकेंद्राच्या विशेष मंजुरी मुळे सातारकरांनी खासदार उदयनराजे भोसले यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.