‘मास’च्या वतीने सातार्यात भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन : अध्यक्ष राजेंद्र मोहिते
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) तर्फे राष्ट्रीय स्तरावरील ’मास औद्योगिक प्रदर्शन 2023’ आयोजित केले असून सातार्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे चार दिवसीय प्रदर्शन 21 ते 24 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती ’मास चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : उद्योजकता विकास व सातारा जिल्ह्यामध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण करणेसाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) तर्फे राष्ट्रीय स्तरावरील ’मास औद्योगिक प्रदर्शन 2023’ आयोजित केले असून सातार्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे चार दिवसीय प्रदर्शन 21 ते 24 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती ’मास चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, मास चे उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, मास औद्योगिक प्रदर्शनाचे चेअरमन धैर्यशील भोसले, हिंदुस्तान फिड्स चे नितीन माने, कवित्सु ट्रान्समिशनचे वसंत फडतरे, परेश आडवाणी, राजेश चोप्रा, गौरव वाखरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, या प्रदर्शनात एकूण 150 स्टॉल्स असणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना चालना मिळणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा.उदयनराजे भोसले, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागातील अधिकार्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यामध्ये किर्लोस्कर ग्रुप, कल्याणी ग्रुप, कुपर ग्रुप यांचे अनेक दशकापासून देशाच्या औद्योगिक क्रांतीत सिंहाचा वाटा आहे.
सातारा जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी अनेक उद्योजक प्रयत्न करीत आहेत. सातारा हे तसे उद्योगवाढीसाठी उत्तम ठिकाण आहे. पुणे पासून अत्यंत जवळ, मुबलक पाणी, अखंडित वीज पुरवठा, दळणवळणाची उत्तम सोय यामुळे सातारा हे राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होत आहे.
सातारा औद्योगिक क्षेत्रात स्वतःची उत्पादने असणारे अनेक उद्योग आहेत. त्यांना चालना देण्यासाठी, त्यांची उत्पादने जगाच्या बाजार पेठेमध्ये जाण्यासाठी आपण सातारा येथे मास औद्योगिक प्रदर्शन 2023 चे आयोजन करत आहोत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्याच्या सर्व औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक सातारला येणार आहेत. त्याच बरोबर संरक्षण विभाग, रेल्वे विभाग, कृषी विभाग इत्यादी सरकारी विभागातील राष्ट्रीय उद्योगांचे अधिकारी प्रतिनिधीही प्रदर्शनास भेट देणार आहेत.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर देश-विदेशातून औद्योगिक व व्यापार क्षेत्रातील शिष्टमंडळे निर्यातक्षम उद्योगवाढीसाठी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने विदयार्थाना अनेक नवीन प्रॉडक्ट, अद्यावत मशीनरी व तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता येणार आहेत व त्यातूनच भावी उद्योजक निर्माण होणार आहेत. हा सर्व सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक वाढीस पूरक असा प्रकल्प आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांनी यासाठी पुढाकार घेऊन या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
सातारा जिल्ह्यात रबर, प्लास्टिक, औषध निर्माण, प्रेसशॉप्स, वैद्यकीय यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी औजारे आदीचे उत्पादक आहेत. नवीन औद्योगिक धोरणामुळे सातारा जिल्हयात, शिरवळ, खंडाळा, लोणंद व फलटण येथे अनेक बहुराष्ट्रीय उद्योग उभारण्यात आले आहेत. या उद्योगांना तसेच पुणे, कोल्हापूर, चिपळूण, गोवा, बेळगाव जिल्ह्यातील प्रस्थापित उद्योगांना अनेक प्रकारची यंत्रसामुग्री, मशिनरी, स्पेअर्स पार्टस व इतर सेवा कायमस्वरूपी लागत असतात. सातारा येथील उद्योजकांना यासाठी ही मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
धैर्यशील भोसले म्हणाले, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांनी यापूर्वी 2015 व 2018 मध्ये औद्योगिक प्रदर्शन भरवले होते. त्यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन झाले नाही. मात्र, यानंतर मास ने मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन केले होते. त्यालाही देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. तिसर्या वेळेस ‘मास’ने आता 2023 रोजी भव्य औद्योगिक प्रदर्शनाची परंपरा पुन्हा सुरु केली आहे.
या प्रदर्शानाद्वारे सातारा येथील उद्योगांची उत्पादने व उत्पादन क्षमता याची माहिती नवीन आलेल्या कंपन्यांच्या अधिकार्यांना करून देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात म्हणजे मेक इन सातारा हा ब्रँड प्रमोट करणे व सातार्याच्या उद्योगवाढीला गती देणे, यासाठी मास ने या प्रदर्शनाद्वारे एक मोठे पाऊल उचलले आहे.
सदरचे औद्योगिक प्रदर्शन हे सातारा जिल्ह्यातील उद्योग व्यवसायासाठी संधी ठरणार असून या ठिकाणी विविध अशा कंपन्या तसेच उत्पादक असे मिळून दीडशे स्टॉल्स असणार आहेत. ग्रामीण भागातील लघुउद्योजकांनाही संधी प्राप्त करून देण्यासाठी मास पदाधिकारी प्रयत्नशील असल्याची माहिती नितीन माने, वसंत फडतरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


