maharashtra

महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या !

सामूहिक बारसे उपक्रमाचे चित्रा वाघ यांच्याकडून कौतुक

महिला जोपर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत सक्षमीकरण होऊ शकत नाही. महिलांमध्ये आव्हानांचा सामना करण्याची ताकद निश्चित आहे. महिलांना तुम्ही देवी म्हणण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार द्या, असे प्रतिपादन भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.

सातारा : महिला जोपर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत सक्षमीकरण होऊ शकत नाही. महिलांमध्ये आव्हानांचा सामना करण्याची ताकद निश्चित आहे. महिलांना तुम्ही देवी म्हणण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार द्या, असे प्रतिपादन भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.
सातारा येथील राधिका संकुलात महिला दिनाच्या निमित्ताने आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील सत्तरहून अधिक मुलींच्या बारशाचा कार्यक्रम भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नारीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष सुनेशा शहा, सुरभी भोसले, प्रदेश कार्यकारणीच्या सदस्या सुवर्णाताई पाटील, माजी नगरसेवक विकास भोसले, विठ्ठल बलशेठवार आदी उपस्थित होते.
चित्राताई वाघ पुढे म्हणाल्या, "सामूहिक विवाह सोहळ्याबाबत ऐकले होते पण सामूहिक बारसे पहिल्यांदाच ऐकले. सातारा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या सामूहिक बारशाचा आजचा उपक्रम राज्याला नक्कीच दिशा देणार आहे. असा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रथमच होत असेल. महिला जर एक दिवस कामातून ब्रेक घेऊन जर सुट्टीवर गेली तर काय होईल याची कल्पना कोणी करू शकत नाही. महिलांना देवत्व देऊ नका, पण माणूस म्हणून जगण्याचा नक्की अधिकार द्या. आजची महिला कुठेच कमी नाही. आव्हानांची मुकाबला करण्याची तिच्यात क्षमता आहे. तिला आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. आगामी काळात ती आर्थिकदृष्ट्या स्वयंभू कशी होईल हे बघणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांच्या कर्तुत्वाला वाव दिला जाणार आहे.
यावेळी एक ते दोन वर्षाच्या मुलींचे बारसे करण्यात आले. 51 मुलींचे बारशाचे नियोजन करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात 70 पेक्षा जास्त मुलींचे नामकरण यावेळी झाले. या उपक्रमाचा मनस्वी आनंद होत असल्याचे चित्राताई वाघ यांनी सांगितले. नवजात मुलींना भेटवस्तू, पालकांना पोशाख करण्यात आले. हळदीकुंकू, वाणवाटप तसेच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना चित्राताई म्हणाल्या, राजघराण्यातील सदस्यांचा भाजपमध्ये सन्मान होत नसल्याचे विरोधकांचे आरोप त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना फेटाळले. त्या म्हणाल्या, हातातोंडाशी असलेला घास गेल्यामुळे विरोधक निराश अवस्थेत आहेत. त्यामुळे वाटेल ते बोलत आहेत. त्यांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महिला सुरक्षिततेला सरकार प्राधान्य देत आहे. शक्ती कायदा झाला तर त्याचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यात महिला अत्याचारांवर कसूर केलेल्या बारा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. बारा वर्षाच्या आतील मुलीवर अत्याचार झाल्यास फाशीची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकार तयारीत आहे. महिलांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे, असेही त्या म्हणाल्या.