दिवंगत आईच्या स्मृती जपताना विसापूर, ता. खटाव येथील सावंत कुटुंबीयांनी शाळेला ५१ हजारांची देणगी दिली आहे. त्यांच्या शैक्षणिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पुसेगाव : दिवंगत आईच्या स्मृती जपताना विसापूर, ता. खटाव येथील सावंत कुटुंबीयांनी शाळेला ५१ हजारांची देणगी दिली आहे. त्यांच्या शैक्षणिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विसापूर येथील तुकाराम, अविनाश आणि उमेश सावंत यांच्या आईचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून या भावंडांनी शाळा विकासात हातभार लावला.
त्यातून ५१ हजार रुपयांची ठेवपावती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर धायगुडे यांच्याकडे सुपूर्द केली. कै. इंदूबाई सावंत यांचे पती माधवराव हे शेतकरी होते. प्रचंड कष्ट आणि मेहनतीतून त्यांनी मुलांना घडविले. स्वातंत्र्यसैनिक व तालुकामास्तर कै. शंकरराव जनोबा शिंदे यांच्या त्या भगिनी होत. त्यांचे चिरंजीव तुकाराम पोलीस दलात, अविनाश नौदलात अन उमेश प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. गरजू विद्यार्थ्यांपासून वारकऱ्यांपर्यंत कित्येकांना मोलाची मदत करतात. कार्यक्रमासाठी सागर साळुंखे, हरी सावंत, निलम जगताप, विठ्ठल साळुंखे, प्रल्हाद सावंत, तानाजी शिंदे, अनिल साळुंखे, संजय शिंदे, डॉ. सुधीर सावंत, कैलास साळुंखे, राजेश ढोले आदी ग्रामस्थ तसेच वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे हे शिक्षक उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शाळेला मदत केल्याचे समाधान
विसापूर येथील प्राथमिक शाळा जिल्ह्याच्या शैक्षणिक पटलावर अग्रेसर आहे. येथील शिक्षक ग्रामस्थांना बरोबर घेऊन शाळेसाठी झटत आहेत. २० लाख लोकसहभागातून शाळेचा कायापालट झाला आहे. ग्रामीण मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या माझ्या गावच्या शाळेला मदत केल्याने समाधान वाटत आहे. भविष्यातही शाळेच्या विकासासाठी तत्पर राहू.
- उमेश सावंत


