एटीएम कार्ड चोरून २ लाख रुपये लंपास करणाऱ्या संशयिताला अटक
१ लाख ८० हजार रुपये हस्तगत ; गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कारवाई
एटीएम कार्ड चोरून त्याचा वापर करत २ लाख रुपये लंपास करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्याच्याकडुन १ लाख ८० हजार रुपये हस्तगत करण्यात आले असुन अजित पांडुरंग नांगरे, वय ३६, रा. भादुले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सातारा : एटीएम कार्ड चोरून त्याचा वापर करत २ लाख रुपये लंपास करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्याच्याकडुन १ लाख ८० हजार रुपये हस्तगत करण्यात आले असुन अजित पांडुरंग नांगरे, वय ३६, रा. भादुले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी खिंडवाडी, ता. सातारा गावातील शिवाजी साहेबराव चव्हाण, वय ६५ यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एटीएम कार्ड चोरले होते. संबंधित चोरट्याने २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२२ पर्यंत वेळोवेळी त्यांच्या खात्यातून २ लाख रुपये त्यांच्या संमतीशिवाय काढले होते. ही माहिती कळताच शिवाजी चव्हाण यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शिवाजी चव्हाण यांच्याकडे विचारपूस करून संशयितांची नावे प्राप्त केली होती.
तपासादरम्यान एका संशयितावर अधिक संशय बळविल्यामुळे तांत्रिक माहिती प्राप्त करून पथकाने अजित पांडुरंग नांगरे या संशयिताला कोल्हापूर जिल्ह्यातील भादुले या गावातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलीस कोठडीमध्ये अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र पथकाने तांत्रिक पुराव्यावरून त्याला बोलते केल्यानंतर त्याने एटीएम चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख ८० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. अजित नांगरे हा दि. २१ डिसेंबर रोजी शिवाजी चव्हाण यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांचे प्रॉडक्ट देण्याकरता आला होता. चव्हाण हे वृद्ध असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन त्याने त्यांचे एटीएम कार्ड चोरले तसेच एटीएम पिनची माहिती घेऊन हा गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली आहे.


